युगांत

मिल्खासिंग यांच्या निधनाने देशाने एका महान खेळाडू, खरा सपूत आणि एक अनुकरणीय असे धैर्यशील व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांची महानता त्यांनी केलेल्या मैदानावरील पराक्रमात होतीच. कारण आशियाई गेम्स आणि कॉमन वेल्थ गेम्स या दोन्ही ठिकाणी सुवर्ण पदक मिळवणारे ते एकमेव धावपटू होते. त्याबरोबरच त्यांची महानता या क्रीडामैदानावरील, ऑलिम्पिकमध्ये आलेल्या अपयशात सुद्धा आहे. मैदानावर घालवलेल्या काळाबरोबर त्यांनी मैदानाच्या बाहेर जे आयुष्य घालवले त्याच्याबद्दलही आहे. खेळाडूचे मैदानावरील आयुष्य अल्प असते, त्यानंतरचे, मैदानाबाहचे आयुष्य तो खेळाडू कसा घालवतो याच्यावर त्याच्या व्यक्तिमत्त्वाची झलक कळत असते. मिल्खा सिंग यांचे निधन झाले आणि त्यांनी जेंव्हा पराक्रम गाजवले यामध्ये अनेक दशकांचे अंतर आहे. तरीही ते एक आदरणीय, सन्माननीय आणि एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून जगले. त्यांच्या निधनाने भारतीय उपखंडातील भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या इतिहासाचे एक पर्व लयास गेले आहे, एका युगाचा अंत झाला आहे. त्यांची महानता त्यांनी मिळवलेल्या पदकांमुळेच केवळ नाही. त्यांनी आपल्या गत काळातील घटनामुळे आपल्या वर्तमान आयुष्याला मर्यादा येणार नाहीत; या कटू घटना त्यांच्या आयुष्याला सीमित करणार नाहीत याची त्यांनी पुरेपूर खबरदारी घेतली. त्यांचा जन्म आता पाकिस्तानमध्ये असलेल्या गोविंदपुरा येथे झाला. त्यानंतर काही वर्षांतच भारत-पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर उसळलेल्या दंगलीत ते तेथून पळाले. त्यांचे वडील मृत्यूमुखी पडत असताना त्यांनी लहान मिल्खाला प्राण वाचवण्यासाठी दिलेला ‘भाग मिल्खा भाग’ हा आवाज जणू त्यांच्या कानात वार्‍यासारखा शिरला आणि ते पळायला लागले. ते भारतात आले, रेल्वे स्टेशनवर त्यांनी महिनाभर कसेबसे दिवस काढले. त्यांनी डाकू होण्याचेही ठरवले. मात्र पुढे घटना अशा पद्धतीने घडल्या की त्यांच्या आयुष्याला वळण लागले आणि ते सुदैवाने भारतीय लष्करात जवान म्हणून दाखल झाले. त्यांचे आयुष्याच्या या टप्प्यावर सैन्यात येणे हे त्यांच्या पुढच्या आयुष्यातील पराक्रमासाठी, त्यांच्या धीरोदात्त व्यक्तिमत्त्वासाठी अनेक अर्थाने महत्त्वाचे ठरले. कारण तेथे त्यांना त्यांचे गुरू वीरपंडियन व गुरुदेव सिंग यांची भेट झाली आणि त्यांनी त्यांना धावण्याचे विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले आणि तेथे मिल्खा सिंग यांनी आपल्या अंगभूत असलेल्या धावण्याच्या कसबाला पैलू पाडले. आणि त्यातून त्यांचे व्यक्तिमत्त्वही घडत गेले. पुढे त्यांची महत्त्वाकांक्षा आणि त्यांच्या भूतकाळात घडलेल्या घटना बाजूला ठेवून पुढे जाण्याची ईर्षा मैदानावर सातत्याने तळपत राहिली. भारताचे तीनदा ऑलिंपिकमध्ये प्रतिनिधित्व करण्याचे भाग्य त्यांना लाभले आणि तेथे एका शतांश सेकंदाने पदक गमावण्याची नामुष्की त्यांना आयुष्यभर दुखर्‍या जखमेसारखी मिळाली. मात्र कॉमनवेल्थ गेम मध्ये त्यांना सुवर्णपदक मिळविण्याचा सन्मान मिळाला जो विक्रम अनेक वर्षे मोडला गेला नाही. गंमतीची गोष्ट अशी की तो काळ फाळणी नंतरच्या कटूतेचा असला तरी त्याकाळी खेळाडू कृतीला कसे प्रोत्साहन दिले जात होते, त्याचा सन्मान केला जात होता, त्याचबरोबर तेव्हाचे राज्यकर्ते विरोधक असले तरी त्यांच्यामध्ये असलेले याबाबतचे विशेष गुण कसे होते हे सांगितले तर आजच्या पिढीला ते खरे वाटणार नाहीत इतके वातावरण आज गढूळ झालेले आहे. मिल्खा सिंग यांना फ्लाईंग शीख म्हणून ओळखले जाते. हे नामाभिधान प्रत्यक्षात पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आयुब खान यांनी दिले होते आणि मिल्खा सिंग यांचे पाकिस्तानमधील स्पर्धक अब्दुल खालिक यांना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी फ्लाईंग बर्ड ऑफ आशिया अशी विशेष पदवी बहाल केली होती. आणि अब्दुल खालिक यांचा पराभव मिल्खासिंग यांनी दोन देशातील मैत्रीपूर्ण स्पर्धेमध्ये केला होता आणि त्यानिमित्ताने ते पाकिस्तानला आपल्या मूळ गावी जाऊन आले होते. म्हणून मिल्खा सिंग यांच्यामुळे या दोन्ही देशातील फाळणीपूर्व कालखंड जोडला गेला होता. त्यामुळे मिल्खासिंग नेहमी म्हणायचे की मी जेव्हा धावतो तेंव्हा माझ्यासोबत भारत आणि पाकिस्तान दोन्ही धावत असतात. आज या दोन देशांमधील कटुता विकोपाला गेली असली तरीही काही समान गोष्टीने दोन्ही देश जोडले गेलेले आहेत. त्यातील एक महत्त्वाचा दुवा आपण मिल्खासिंग यांच्या निधनाने गमावलेला आहे. त्यांनी मागे ठेवलेला वारसा आणि प्रेरणादायी जीवन देशातील अनेक पिढ्यांना प्रोत्साहित करत राहणार यात शंका नाही. त्यांना कृषीवल परिवारातर्फे विनम्र आदरांजली!

Exit mobile version