लांज्यात एसटी बंदामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा

विद्यार्थ्यांची 5 ते 10 कि. मी. पायपीट
संपाच्या सांगतेची पालकांना प्रतिक्षा

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।

जिल्ह्यातील लांजा परिसरात एसटी बंदामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झाल्याचे चित्र आहे. लांजा आगारातील निम्म्या बसफेर्‍या शालेय विद्यार्थ्यांसाठी होत्या. बंदमुळे या बहुतांश फेर्‍या बंद पडल्याने त्यावर अवलंबून असणार्‍या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागत आहे. कोरोनामुळे शिक्षणापासून वंचित असणार्‍या विद्यार्थ्यांना ज्ञानमंदिरे सुरु होण्याचा आनंद मिळतो, न मिळतो तोच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचार्‍यांनी काम बंदचा पवित्रा घेतला. याचा परिणाम सर्वसामान्यांसोबतच विद्यार्थ्यांवरही मोठ्या प्रमाणात झाला.
तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांची मदार ही लालपरीवर अवलंबून आहे. एसटी बस सेवा बंद असल्याने ग्रामीण भागातून येणार्‍या विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बंदमुळे बस फेर्‍या कमी असून तसेच सुरू असलेल्या मोजक्या बस वेळेत सुटत नसल्याने शिक्षणासाठी कुवे, वनगुळे, इंदवटी, पन्हळे, गवाणे, कोलधे, झापडे-कांटे, केळंबे, खेरवसे, बेनी, आसगे अशा भागातून येणार्‍या विद्यार्थ्यांना 5 ते 10 किमी पायपीट करावी लागत आहे. बसच्या फेर्‍या कमी असल्याने विद्यार्थी पायी प्रवास करत आहेत. लांजातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एसटी बससेवेचा मोठा आधार असतो. मात्र, मोजक्याच बसमुळे रिक्षा व खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. परंतु या तुलनेत एसटीचा प्रवास सर्वसामान्यांना खिशाला परवडणारा असून इतर खासगी वाहनांच्या तुलनेत एसटी बसचा प्रवास कमी खर्चिक असतो.
लांजा आगाराचा 70 टक्के कारभार ठप्पच आहे. संपामुळे काही मोजक्या मार्गावर बसफेर्‍या असल्याने विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शालेय अभ्यासक्रम फेब्रुवारीमध्ये संपल्यानंतर परीक्षांची लगबग सुरू होते. शाळा व महाविद्यालयांमध्ये आता सराव परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन यामध्ये प्रात्यक्षिके, तोंडी परीक्षा सुरू झाल्या असून एसटी बसच्या कमी फेर्‍या आहेत. संपाने गेले तीन महिने एसटी बस सेवा बंद असल्यामुळे एसटी बसचा संप कधी मिटेल, याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांसह पालक वर्गाला लागून राहिली आहे.

एसटी बंदमुळे आमच्या गावातील मुले ही लांजा ते वेरळ आठ कि.मी. दररोज लांज्यातून चालत येतात. विद्यार्थी घरी आल्यावर चालून थकल्यामुळे त्वरित झोपतात. यामुळे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. – सोनाली मेस्त्री, उपसरपंच, वेरळ

एसटीचा संप सुरू झाल्यापासून मी माझ्या गाडीतून मोफत वेरळ ते लांजा अशी ये-जा करण्याची व्यवस्था केली. या गाडीतून सगळेच विद्यार्थी आणू न शकल्याची मला खंत आहे. – मुकेश कुलकर्णी, देवधे

Exit mobile version