। अलिबाग । प्रतिनिधी ।
विद्यार्थ्यांना योग्य करिअर दिशा मिळावी, शिक्षणातील विविध संधींची माहिती व्हावी आणि बदलत्या काळातील आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी व्हावी, या उद्देशाने आगरी समाज संस्था, अलिबाग यांच्या वतीने करिअर व शैक्षणिक मार्गदर्शन अभियानाची सुरुवात शनिवारी (दि.20) आयईएस शाळा, वरसोली येथे करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपशिक्षणाधिकारी सुनील भोपळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करून करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले.
उपशिक्षणाधिकारी भोपळे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना यशासाठी कठोर परिश्रम, सातत्य आणि दृढ इच्छाशक्ती यांचे महत्त्व पटवून दिले. तर प्रमुख मार्गदर्शक मिलिंद धोदरे यांनी दहावी व बारावीनंतर उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक शाखा, व्यावसायिक अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती योजना आणि करिअरच्या अनेक पर्यायांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता या नव्या तंत्रज्ञानाची माहिती देऊन भविष्यात विद्यार्थ्यांसमोर निर्माण होणारी आव्हाने आणि त्यासाठी आवश्यक कौशल्ये याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी आगरी समाज संस्थेचे उपाध्यक्ष सुनिल तांबडकर, मार्गदर्शक अनंत म्हात्रे, उदय म्हात्रे, तुषार थळे, मनोहर पाटील, श्रेयस प्रभाकर ठाकूर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शैक्षणिक कार्यक्रम समितीचे मिलिंद धोदरे, राजेंद्र पाटील, शुभांगी म्हात्रे, शशिकांत मिठागरी, जयवंत पाटील, प्रकाश मिठागरी यांनी विशेष परिश्रम घेतले.







