अश्वपरीस फाऊंडेशनचा सामाजिक उपक्रम
| वावोशी | प्रतिनिधी |
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून समाजातील गरजू घटकांसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या अश्वपरीस फाऊंडेशनच्या वतीने प्रथमच आनंद शाळा, खोपोली शीळफाटा येथे एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने आनंद शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी भरून त्यांना शिक्षणासाठी दिलासा देण्यात आला.
आपण समाजाचे देणे लागतो, ही भावना मनात ठेवून विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी पूर्णतः समाजातील मदतीच्या हातांनीच भरावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. समाजातील विविध घटकांकडून लाभलेल्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. ही मदत केवळ जबाबदारी नसून समाजाप्रती असलेली जाणीव व कर्तव्य आहे, या विचारातून हा उपक्रम साकारण्यात आला. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, त्यांना आत्मविश्वास मिळावा आणि पुढील शैक्षणिक वाटचालीस बळ मिळावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना शुभेच्छा व प्रोत्साहन देण्यात आले असून भविष्यातही गरजू विद्यार्थी तसेच समाजातील दुर्बल घटकांसाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. तसेच राष्ट्र घडविण्यासाठी शिक्षण हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, या ध्येयाने अश्वपरीस फाऊंडेशन समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवत असल्याचे नमूद करण्यात आले.
या कार्यक्रमास आनंद शाळेच्या शिक्षिका आसावरी दंडवते, मुख्याध्यापिका सीमा त्रिपाठी, तसेच अश्वपरीस फाऊंडेशनच्या बनिता सहा, सुरेखा नायकर, कार्तिक नायकर, निजल खान व मुस्तफा खान यांची उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा सामाजिक कार्याची नितांत आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. अश्वपरीस फाऊंडेशनतर्फे भविष्यातही शिक्षण, आरोग्य व सामाजिक सशक्तीकरण या क्षेत्रांत असेच उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.






