पांढर्या कांद्याची लागवड लांबणीवर
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
परतीच्या पावसाचा फटका रायगड जिल्ह्यातील भात पिकाबरोबरच जानेवारीत तयार होणार्या अलिबागमधील पांढर्या कांदा उत्पादनावरही बसला आहे. सतत पाऊस सुरु राहिल्याने यंदा जमीनीत ओलावा वाढला आहे. यामुळे यावर्षी अलिबागच्या पांढर्या कांद्याची लागवड एक महिना उशीरा होणार असल्याची माहिती कांदा उत्पादक शेतकर्यांनी दिली आहे.
औषधी गुणधर्म असलेला पांढरा कांदा म्हणून अलिबागच्या कांद्याला ओळखले जाते. अलिबाग तालुक्यात सुमारे तीनशेहून अधिक एकर कांद्याचे क्षेत्र आहे. एक हजारहून अधिक शेतकरी कांदा उत्पादक आहे. चविष्ट व रुचकर अशी अलिबागच्या पांढर्या कांद्याची ओळख आहे. कार्ले, खंडाळे, वाडगाव, सागाव, तळवली, नेहुली अशा अनेक भागात पांढर्या कांद्याची लागवड केली जाते. कांदा उत्पादनातून करोडो रुपयांची उलाढाल होते. दरवर्षी स्थानिकांसह पर्यटक अलिबागचा कांदा खरेदी करण्यासाठी येत असतात. अलिबागच्या या पांढर्या कांद्याला मुंबई, पुणेसह अनेक जिल्ह्यात तसेच देशात प्रचंड मागणी आहे.
यावर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला आहे. भातशेतीला पोषक असे वातावरण मिळाले आहे. परंतु, परतीच्या पावसामुळे भातशेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्याची झळ अलिबागच्या कांद्याला पोहचली असल्याची चिंता कांदा उत्पादक शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. परतीच्या पावसामुळे जमीनीत ओलावा राहिला आहे. ओलाव्यामुळे कांद्याची रोपे तयार होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. पावसामुळे कांद्याची लागवड यावर्षी एक महिना उशीरा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. डिसेंबरमध्ये ही लागवड होईल, असे शेतकर्यांकडून सांगण्यात आले आहे. कांदा उशीरा बाजारात दाखल झाल्यास त्याचा शेतकर्यांच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची चिंता शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.
महिलांना रोजगाराचे साधन
दिवाळीला पांढर्या कांद्याची रोपे तयार करून त्याची लागवड केली जाते. यानंतर जानेवारीमध्ये कांदा तयार होतो. दोन ते अडीच महिन्याच्या कालावधीत ही प्रक्रीया पुर्ण होते. कांदा तयार झाल्यावर कांदा शेतातून काढणे, तो सुकविणे, त्याच्या माळी तयार करणे, बाजारात विक्रीसाठी पाठविणे अशी अनेक प्रकारची कामे केली जातात. यातून स्थानिक महिलांनाही रोजगाराचे साधन खुले होत असून शेकडो हातांना काम मिळते.
बाहेरील कांदा विक्रीवर अंकूश
अलिबागच्या कांद्याला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. यामुळे अलिबागच्या कांद्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्याची प्रक्रीया सुरु झाली असून शेतकर्यांचे गट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक शेतकर्यांना बारकोट मिळणार आहे. यामुळे अलिबागच्या नावाने बाजारात येणारा अन्य जिल्ह्यातील व भागातील कांदा विक्रीवर अंकुश राहणार आहे.
पांढर्या कांद्याची रोपे तयार केली आहेत. परंतु, परतीच्या पावसामुळे प्रचंड त्रास होत आहे. कांद्याची रोपे पावसात खराब होऊ नये यासाठी त्यावर प्लास्टिकचे आवरण टाकले जात आहे. ही रोपे कुजण्याची भितीदेखील आहे. यंदा पांढर्या कांद्याची लागवड एक महिना उशीरा होणार आहे. त्याचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
– सतिश म्हात्रे, कांदा उत्पादक शेतकरी