मालती राऊत यांच्यावर कौतुकाचा वर्षाव
| अलिबाग | शहर प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील आक्षी येथील समुद्रकिनारी बसण्यासाठी स्टीलच्या आठ बेंचेसचे आक्षी ग्रामपंचायतीतर्फे सोमवारी (दि.15) लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अलिबाग तालुक्यातील आक्षी समुद्रकिनाऱ्यावर गेल्या काही वर्षांपासून पर्यटकांची रेलचेल वाढत आहे. त्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळत आहे. तसेच, पर्यटन वाढीसाठी या ठिकाणी आक्षी ग्रामपंचायती तर्फे विविध विकास कामे करण्यात आली आहेत. त्यात समुद्रकिनारी विजेच्या दिव्यांची व्यवस्था, निवारा शेड, कचरा कुंड्या आणि बसण्यासाठी बेंचेस इत्यादी व्यवस्था करण्यात आल्या आहेत. मात्र, निवारा शेडमध्ये पर्यटकांसह स्थानिकांना बसण्यासाठी असलेल्या सिमेंटच्या बेंचेसची दयनिय अवस्था झाली होती. त्यामुळे याठिकाणी पर्यटकांसह स्थानिकांची बसण्यासाठी होणारी गैरसोय लक्षात घेता आक्षी गावच्या ज्येष्ठ महिला मालती राऊत यांनी पुढाकार घेत स्टिलचे आठ बेंचेस आक्षी ग्रामपंचायतीला भेट दिले आहेत. त्यांनी त्यांचे पती दशरथ राऊत व मुलगा प्रसाद राऊत यांच्या स्मरणार्थ ही भेट दिल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्याच बरोबर सिमेंटचे 4 बेंचेस देखील आक्षी स्मशानभूमीला भेट दिले आहेत. या बेंचेसचा लोकार्पण सोहळा सोमवारी (दि.15) मालती राऊत यांच्या हस्ते आक्षी समुद्रकिनारी पार पडला. दरम्यान, त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे. तसेच, गावच्या रहिवाशांनी देखील असाच पुढाकार घेत आक्षी गावच्या पर्यटन वाढीसाठी हातभार लावावा, जेणेकरून स्थानिकांसह येथील व्यावसायिकांना त्याचा फायदा होईल, असेही मालती राऊत यांनी उपस्थितांना आवाहन केले. यावेळी मालती राऊत यांच्यासह सरपंच रश्मी पाटील, उपसरपंच आनंद बुरांडे, सदस्य रश्मी वाळंज, माजी सरपंच नंदकुमार वाळंज, सुनील नाईक, रश्मीन गुरव, श्रेया गुरव, आश्लेषा नाईक, अभिजित वाळंज आदींसह स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







