अलिबाग मुरुड तालुक्यातील आठ पुल धोकादायक

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग मुरुड तालुक्यातील आठ पुल धोकादायक झाले आहेत. यातील खडताळ आणि सहान बायपास वरील पाले पुल नव्याने बांधण्यात येणार असल्याची माहिती अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. खडताल पुलासाठी 10 कोटी तर पालेसाठी साडे सात कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. तर रेवदंडासह अन्य पुलांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती सुखदेवे यांनी दिली आहे.

अलिबाग, मुरुड तालुक्यात 44 लहान 25 मोठे असे एकूण 69 पुल आहेत. यापैकी 13 पुलाचे स्ट्रकचर ऑडिट करण्यात आले असून आठ पुल धोकादायक असल्याचे दिसून आले आहेत. रेवदंडा, खडताळ, एकदरा, आवास, सासावने, सहण पाले, नवेदर बेली हे आठ पुल धोकादायक आहेत.

या पुलाची पुनर्बाधणी करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आले असून रेवदंडा पुलासाठी, खडताळ पुलासाठी दहा कोटी, एकदरा पाच कोटी, सहान पाले साडे सात कोटी, आवास अडीच कोटी तर सासवणे पुलासाठी ऐशी लाख पुनर्बांधणी कामासाठी खर्च होणार आहे. रेवदंडा, एकदरा पुलाच्या कामासाठी निविदा काढण्यात आली आहे. तर उर्वरित पुलासाठी प्रक्रिया सुरू आहे. धोकादायक पुलावरून अवजड वाहने नेण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.

अनेक पुल हे पुरातन
अलिबाग मधील खडताळ पुल हा ब्रिटिश कालीन असून दोनशे वर्ष पुरातन आहे. रेवदंडा पुल हा 1984 साली बांधला असून 38 वर्ष झाली आहेत. तर इतर पुलही चाळीस ते पन्नास वर्षापूर्वी बांधली असून ते जीर्ण झाली आहेत. पुलाचे प्रस्ताव मंजूर झाले असून बजेटमध्ये निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. निविदा प्रक्रिया करण्यात आली असून लवकरच पुलाची कामे सुरू होणार असल्याची माहिती अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीच्या अनुषगाने बांधकाम विभागही सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

Exit mobile version