धोकादायक पुलावरून वाहतूक सुरूच
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
धोकादायक पुलांवरून अवजड वाहतूकीला बंदी असतानादेखील, नवेदर बेली, नवघर, पाल्हे येथील पुलांवरून अवजड वाहने धावत आहेत. अलिबाग-रोहा मार्गावरील नवघर, नवेदर बेली, पाल्हे येथील पुलावरून कंपन्यांसह मोठ-मोठे खासगी ट्रक, डंपर अशा अवजड वाहनांची वाहतूक खुलेआमपणे होत आहे. जिल्हाधिकारी यांचे आदेश असूनदेखील या आदेशाला केराची टोपली दाखवून वाहतूक केली जात आहे. त्यामुळे अवजड वाहन चालकांवर प्रशासनाचा अंकुश राहिला नसल्याचे यावरून दिसून येत आहे.
विजना कन्स्लटींग इंजिनिअरींग प्रा. लि. या संस्थेमार्फत अलिबाग-रोहा, अलिबाग-रेवदंडा, पोयनाड-उसर-भादाणे व भाकरवड-देहेन या मार्गांवरील नवघर पुल, सुडकोली पूल, स्लॅब कलवर्ट, (काँक्रीटचा बनवलेला भाग), सहाण पुल, नवेदर बेली पुल, भाकरवड-देहन रस्त्यावरील देहेन अशा पुलांचे ऑगस्ट महिन्यात स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले होते. या पुलांची व स्लॅब कलवर्टची रस्त्यावरील भार क्षमता पाच ते 16 टन असल्याचे स्पष्ट झाले होते.
जिल्ह्यातील महत्त्वाच्या रस्त्यांवरील पूल व स्लॅब कलवर्ट संरचनात्मकदृष्ट्या धोकादायक स्थितीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी या धोकादायक पुलांवरून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्काळ बंदीचा आदेश जारी केला होता. पावसाळ्यामुळे पूल अधिक असुरक्षित झाल्याने वाहनचालकांनी व ट्रान्सपोर्ट संस्थांनी प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करावे. अपघात टाळण्यासाठी व जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कार्यवाही करण्यात आली असल्याचे लेखी आदेश काढण्यात आले होते. पुढील आदेश येईपर्यंत बंदी लागू राहणार असून, नियमभंग करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी स्पष्ट केले होते.
अलिबाग-रोहा मार्गावरील नवघर, सुडकोली, नवेदरबेली, सहाण पाल्हे येथील धोकादायक पुलांवरून कंपन्यांच्या मोठ मोठ्या गाड्यांसह काही खासगी ट्रक, डंपरसारखी अवजड वाहने पहाटेच्या वेळी तसेच रात्रीच्यावेळी खुलेआमपणे ये-जा करीत आहेत. अलिबाग तालुक्यातील वढाव – खानाव मार्गावरील पुलाची क्षमता 12 टनापर्यंत असताना या पुलावरून त्याहून अधिक वजनाची कंपनीची वाहने बिनधास्तपणे धावत होती. त्यामुळे वढाव येथील पुल (साकव) सोमवारी सायंकाळी कोसळला. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून येथील प्रवाशांची वणवण सुरु आहे. वाहतूक दोन्ही मार्गावरून बंद झाल्याने पर्यायी मार्ग म्हणून गाव, गल्ल्यातून ये-जा करण्याची वेळ चालकांसह प्रवाशांवर आली आहे.
वढाव येथील पुलाची दुर्घटना घडूनही नवेदर बेली, सहाण-पाल्हे तसेच नवघर पुलावरून आजही अवजड वाहने धावत आहेत. वाहतूक पोलिसांनी बॅरिकेट लावून अवजड वाहनांना बंदी असल्याच्या सुचना देऊनही अवजड वाहने या रस्त्यावरून ये-जा करीत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली अवजड वाहन चालकांकडून होत आहे. याकडे मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांचे अवजड वाहतूक बंदीचे आदेश फक्त कागदावर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
अलिबाग - रोहा रस्ता त्रासदायक
अलिबाग ते साईपर्यंत 85 किलोमीटरचा रस्ता 2019 पुर्वी मंजूर झाला होता. या रस्त्याच्या कामासाठी 177 कोटी रुपये मंजूर झाले होते. नारळफोडीनंतर मागील तीन वर्षापासून प्रत्यक्षात रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. मात्र या कामाचा दर्जा निकृष्ट असून ठिकठिकाणी खड्डे, अपूर्ण पुल, अशा अनेक समस्यांना स्थानिकांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे हा रस्ता स्थानिकांसाठी त्रासदायक ठरला आहे.
ठेकेदाराची निवड राजकीय दबावातून?
अलिबाग-रोहा मार्गावरील रस्ता पावसाळ्यात दलदलीसारखा बनत आहे. शाळकरी मुले, कामगार आणि शेतकरी व प्रवाशांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याच्या कामासाठी ठेकेदाराची निवड राजकीय दबावाखाली झाली असून निधीचा गैरवापर करण्यात आला असल्याची चर्चा आहे. अलिबाग-रोहा रस्त्याच्या रुंदीकरणासह मजबुतीकरण, नूतनीकरणाच्या कामासाठी ठेकेदाराला 104 कोटी रुपये दिले आहेत. मात्र काम पुर्ण केले नसल्याची चर्चा सध्या सुरु आहे. त्यामुळे 104 कोटी रुपये कोणाच्या घशात गेले? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अलिबाग रोहा रस्ता हा विकासाऐवजी भ्रष्टाचार आणि निष्क्रियतेचे प्रतीक बनला आहे.
प्रवाशांची वणवण संपेना
रोहा मार्गावरील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वढाव येथील पुल कोसळल्यानंतर रोहा व अलिबाग मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूकीवर त्याचा परिणाम झाला आहे. त्याचा फटका भाजी विक्रेत्यांपासून, शाळा महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, नोकरी, व्यवसायानिमित्त जाणाऱ्या कामगारांना बसला आहे. पर्यायी रस्ता म्हणून काही गावांतील गल्लीतून रस्ता काढण्याची वेळ स्थानिकांवर आलीआहे. त्यामुळे प्रवाशांची वणवण संपेना असे चित्र दिसून येत आहे.
अवजड वाहतूकीवर राहणार नजर
अलिबाग-रोहा मार्गावरील नवघर, वढाव, सहाण बायपास येथील पाल्हे, अलिबाग रेवदंडा मार्गावरील नवेदर बेली पुल धोकादायक आहे. या पुलांवरून अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. वढाव येथील पूल कोसळण्याची पुनरावृत्ती घडू नये, म्हणून पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. पोलिसांना पत्र देऊन अवजड वाहतूकीवर लक्ष ठेवण्याची मागणी केली जाणार आहे. तसेच वढाव येथील पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून गुरुवारपासून हा पुल वाहतूकीसाठी खूला होण्याची शक्यता आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता मोनिका धायतडक यांनी दिली.
धोकादायक पुलांवर अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. ठिकठिकाणी फलक लावण्याच्या सुचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत. काही पूल दूरुस्त केले आहेत. त्या पुलावरून 16 टनापर्यंतच्या वाहनांना प्रवेश आहे.
अभिजीत भुजबळ
पोलीस निरक्षक, रायगड





