शेतकऱ्यांवर एल नीनोचे संकट

पावसाची अनिश्चितता वाढली, कृषी क्षेत्रासमोर नवे आव्हान!

| माणगाव | प्रतिनिधी |

भारतीय शेती ही प्रामुख्याने मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसातील कोणताही बदल थेट शेतकऱ्यांच्या जीवनावर परिणाम करतो. सध्या हवामान क्षेत्रात वारंवार चर्चेत असलेला ”एल नीनो” हा शब्द शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकणारा ठरत आहे. एल नीनोमुळे पावसाचे प्रमाण कमी होणे, पावसाचे असमान वितरण, दीर्घ खंड पडणे आणि दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी चिंतेत असून, ”यंदा पाऊस कसा पडणार?” हा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे.

एल नीनो म्हणजे नेमके काय? 
एल नीनो ही प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात घडणारी एक नैसर्गिक हवामान प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत समुद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याचे तापमान नेहमीपेक्षा जास्त वाढते. समुद्रातील या तापमानवाढीमुळे जगभरातील वाऱ्यांचे आणि पावसाचे चक्र बदलते. त्याचा परिणाम भारतासह अनेक देशांच्या हवामानावर होतो. सामान्यतः भारतात मान्सूनला पोषक असणारे वातावरण एल नीनोमुळे कमकुवत होते. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होण्याची किंवा पावसाचा कालावधी विस्कळीत होण्याची शक्यता वाढते.
पावसाची स्थिती कशी असू शकते? 
एल नीनोच्या प्रभावामुळे खालील परिस्थिती निर्माण होऊ शकते मान्सून उशिरा दाखल होणे. पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहणे. काही भागात अतिवृष्टी तर काही भागात कोरडे वातावरण निर्माण होते. पावसामध्ये दीर्घ खंड पडणे. खरीप पिकांच्या वाढीच्या काळात आवश्यक ओलावा न मिळणे. भू-जल पातळीत घट होणे. जलसाठ्यांवर ताण वाढणे. तथापि, एल नीनो असला तरी प्रत्येक वेळी दुष्काळच पडतो असे नाही. स्थानिक हवामान घटक, समुद्री परिस्थिती आणि वातावरणीय बदल यांचाही पावसावर प्रभाव असतो.
शेतकऱ्यांवर होणारे दुष्परिणाम
एल नीनोचा सर्वाधिक फटका शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसतो. पेरणी उशिरा होणे, पावसाअभावी पेरणी लांबते. त्यामुळे उत्पादन चक्र विस्कळीत होते, बियाणे आणि खतांचा अतिरिक्त खर्च, पहिली पेरणी फसल्यास दुबार पेरणी करावी लागते. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढतो, उत्पादनात घट, पिकांना आवश्यक पाणी न मिळाल्याने उत्पादन कमी होते. भात, मका, सोयाबीन, कडधान्ये आणि भाजीपाला पिकांवर मोठा परिणाम होतो, जनावरांसाठी चारा टंचाई, पावसाअभावी हिरवा चारा उपलब्ध होत नाही. त्यामुळे पशुपालकांसमोरही संकट निर्माण होते, कर्जबाजारीपणा वाढणे, उत्पन्न घटल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढतो आणि कर्जफेडीची समस्या गंभीर बनते, पिण्याच्या पाण्याचे संकट विहिरी, तलाव आणि धरणांमधील जलसाठे कमी झाल्यास ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण होते.
हवामान बदलामुळे वाढतेय चिंता 
तज्ज्ञांच्या मते, जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलामुळे एल नीनोसारख्या घटनांचे परिणाम अधिक तीव्र होत आहेत. पूर्वी नियमित आणि संतुलित स्वरूपात पडणारा पाऊस आता कमी कालावधीत अतिवृष्टी किंवा दीर्घकाळ कोरडे वातावरण अशा टोकाच्या स्वरूपात अनुभवास येत आहे. त्यामुळे शेती नियोजन अधिक कठीण बनले आहे.
या संकटावर उपाय काय?
हवामान आधारित शेती, हवामान विभागाच्या अंदाजानुसार पेरणी आणि पीक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे, कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड, ज्वारी, बाजरी, नाचणी, तूर, मूग यांसारख्या कमी पाण्यात तग धरणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावे. जलसंधारणावर भर शेततळे, बंधारे, पावसाचे पाणी साठवण आणि ठिबक सिंचन यांचा वापर वाढवावा.

पीक विमा योजना, अनिश्चित हवामानामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी पीक विमा संरक्षण महत्त्वाचे ठरते. आधुनिक सिंचन पद्धती ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर करून पाण्याचा काटकसरीने उपयोग करावा. सामूहिक जलव्यवस्थापन, गावपातळीवर पाणी साठवण आणि वापराचे नियोजन करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांसाठी सतर्कतेचा इशारा कृषी तज्ज्ञांच्या मते, एल नीनो हा घाबरण्याचा विषय नसून नियोजन करण्याचा विषय आहे. हवामानाचा नियमित आढावा घेणे, कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आणि जलसंधारणावर भर देणे ही काळाची गरज आहे.
काळजी, नियोजन आणि एकजूट हाच मार्ग
एल नीनोमुळे निर्माण होणारी परिस्थिती शेतकऱ्यांसाठी नक्कीच चिंताजनक आहे. मात्र, योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जलसंधारण आणि शासनाच्या योजनांचा लाभ घेतल्यास या संकटाचा सामना करता येऊ शकतो. शेती हा केवळ व्यवसाय नसून देशाच्या अन्नसुरक्षेचा पाया आहे. त्यामुळे शेतकरी वाचला तरच शेती वाचेल आणि शेती वाचली तरच देशाची अर्थव्यवस्था सक्षम राहील. आज गरज आहे ती शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची आणि बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी त्यांना सक्षम बनविण्याची आहे.
Exit mobile version