कर्मचारी लागले कामाला; मतदार यादी बनवण्याची लगबग सुरु
| अलिबाग | प्रतिनिधी |
मुदत संपणाऱ्या रायगड जिल्ह्यातील 276 ग्रामपंचायतीच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह महसूल कर्मचारी मतदारांची यादी तयार करण्याच्या कामाला लागले आहे. अलिबागसह जिल्ह्यातील तहसील कार्यालयात या कामाची लगबग असल्याचे चित्र पहावयास मिळाले. राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार,जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच निधन, राजीनामा, किंवा इतर कारणांमुळे ग्रामपंचायत सदस्यांच्या रिक्त झालेल्या जागांच्या निवडणुका तसेच पोटनिवडणुकांसाठी पारंपारिक पद्धतीने राबविण्यात येणारा मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर झाला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये 276 ग्रामपंचायतींचाी निवडणूक होण्याची शक्यता आहे.त्यात अलिबाग तालुक्यातील 18, मुरुडमधील 18, पेणमधील 14, पनवेलमधील 18, उरणमधील पाच, कर्जतमधील 10, खालापूरमधील 23, रोहामधील 17, सुधागडमधील 14, माणगावमधील 34, तळामधील 11, महाडमधील 39, पोलादपूरमधील 24, श्रीवर्धनमधील 14 व म्हसळामधील 17 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यामध्ये 207 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक व 69 ग्रामपंचायतींची पोट निवडणूक घेतली जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार मतदार यादी तयार करण्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील तहसील कार्यालयात सुुरू आहे. तहसील कार्यालय अलिबाग येथे अलिबाग तालुक्यातील 15 ग्रामपंचायत आणि तीन पोटनिवडणुका असलेल्या ग्रामपंचायतीची पारंपारिक पद्धतीने मतदार यादी बनवण्याचे काम तहसील कार्यालयातील जंजिरा सभागृहात गेल्या अनेक दिवसांपासून केले जात आहे. 10 ऑगस्टला प्रारुप यादी प्रसिध्द केली जाणार आहे. त्यानुसार ग्रामपंचायत कर्मचारी व महसूल कर्मचारी कामाला लागले असल्याचे दिसून येत आहे. प्रारुप यादी प्रसिध्द केल्यानंतर 21 ऑगस्टपर्यंत त्यावर हरकती मागविल्या जाणार आहेत. त्यानंतर 25 ऑगस्टला अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार आहे.
तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व तीन ग्रामपंचायतीच्या पोट निवडणूका होणार आहेत. त्यानुसार मतदार यादी तयार करण्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. दहा ऑगस्टपर्यंत प्रारुप मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. त्यानुसार ग्रामसेवक, तलाठी यांच्याामार्फत मतदार यादीचे काम वेगात सुरु आहे.
विक्रम पाटील – तहसीलदार, अलिबाग
