| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ जवळील नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावरील धामोते गावातील प्रभात अपार्टमेंट जवळ विजेची वाहिनी खाली जमिनीवर कोसळली होती आणि त्या विजेच्या वहिनीला धक्का लागल्याने शेतकऱ्याची दुभती म्हैस जागीच मृत्युमुखी पडली. याबाबत शेतकऱ्याने आपल्याला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली असून नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
भूषण दत्तात्रय गोमारे या शेतकऱ्यांच्या म्हशी कोल्हारे गावातून धामोते अंबानी बोपेले भागात चरायला येत असतात. नेहमीप्रमाणे गोमारे हे आपल्या म्हशी घेऊन १० जून रोजी सायंकाळी धामोते भागात आले होते. त्यावेळी प्रभात अपार्टमेंट चरायला जात असलेल्या एका म्हशीला तेथे जमिनीवर कोसळलेल्या विजेच्या वाहिनीचा धक्का बसला आणि काही क्षणातच ती दुभती म्हैस तेथे पडली. शेतकऱ्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांना गोळा केले असता संबंधित म्हैस हि मृत असल्याचे निदर्शनास आले असता स्थानिकांनी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी बोलावून घेतले आणि वीज प्रवाह तपासून घेतला.मात्र दुभती मम्हैस मृत झाल्याने शेवटी संबंधित शेतकऱ्याने नेरळ पोलीस ठाणे येथे जाऊन महावितरण च्या चुकीमुळे आपली दुभती म्हैस जीवानिशी गेली असल्याची तक्रार दिली आहार. गोमारे यांनी महावितरण कंपनीवर नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
भूषण गोमारे यांनी आपली मृत झालेली म्हैस किमान एक लक्ष रुपयांची होती असा दावा केला आहे तर याबाबत महावितरण कंपनी कडून नुकसानभरपाई मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल अशी माहिती महावितरण चे शाखा अभियंता राठोड यांनी दिली आहे. तर शेतकऱ्यांच्या अर्जावर नेरळ पोलीस कोणती भूमिका घेतात याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.