पाणी पुरवठा खंडीत; पर्यटन व्यवसयावर परिणाम
। नेरळ । प्रतिनिधी ।
गेल्या तीन दिवसांपासून माथेरान शहरासह संपुर्ण कर्जत तालुक्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे माथेरान शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. माथेरान शहरात गेल्या तीन दिवस वीज पुरवठा खंडित होत असून, त्याचा परिणाम शहरातील पाणी पुरवठ्यावर झाला आहे. दरम्यान, पर्यटन हंगाम लक्षात घेऊन महावितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करणारे निवेदन महावितरणला देण्यात येत आहे.
माथेरान शहरात पर्यटक थंड हवेचा आस्वाद घेण्यासाठी येत आहेत. मात्र, त्याच काळात सोमवारपासून वादळी वारा आणि सोबतीला अवकाळी पाऊस सुरू आहे. या वादळी वार्यामुळे येथील विजेच्या तारांवर मोठ्या प्रमाणात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. परिणामी माथेरान शहरात सोमवार सायंकाळपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. माथेरान शहरात वीज पुरवठा स्तात्याने खंडित होत असल्याने शहराला पाणी पुरवठा होणे देखील बंद झाले आहे. त्याचा थेट परिणाम पर्यटनावर अवलंबून असणार्या हॉटेल्सवर होत आहे. तसेच, घरगुती लॉजींग व्यवसाय करणार्यांच्या समोर देखील व्यवसाय कसा होईल, हा प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, उन्हाळी पर्यटन हंगाम लक्षात घेऊन महावितरण कंपनीने वीज पुरवठ्यात सुधारणा करावी, अशी मागणी आता माथेरानमधील स्थानिक सामाजिक संघटना करू लागल्या आहेत.
महावितरणला निवेदन
माथेरान शहरात जूनच्या मध्यापर्यंत पर्यटक येणार असे गृहीत धरल्यास शहरात पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा सुरळीत राहिल्यास पर्यटन हंगाम चांगला जाणार आहे. त्यासाठी माथेरानमधील व्यापारी फेडरेशन, स्थानिक लॉजिंग व्यवसाय संघटना आणि क्षत्रीय मराठा समाज यांनी महावतिरणशी पत्रव्यवहार केला आहे. महावितरणने आगामी काळात कोणत्याही प्रकारचे शट डाऊन घेऊ नये, अशी सूचना त्यांनी केली आहे. त्याचवेळी जून महिन्यापर्यंत महावितरणची वीज सर्वांना मुबलक आणि अखंडित मिळावी यासाठी प्रयत्न करावेत, असे निवेदन व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष राकेश चौधरी, स्थानिक लॉजिंग व्यवसाय कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष कुलदीप जाधव आणि क्षत्रीय मराठा समाज अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी महावितरणला केले आहे.
आमच्याकडून शहरात अनेक ठिकाणी दुरुस्तीची कामे सुरू आहेत. नेरळ-माथेरान घाट रस्त्यातील झाडे कोसळण्याची समस्या आमच्यासाठी सर्वात मोठी आहे. शहरातील पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आमचे 100 टक्के प्रयत्न सुरू आहेत.
सचिन आटपाडकर,
सहायक अभियंता, महावितरण माथेरान