| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील पाषाणे येथील खाड्याचा पाडा या गावातील विजेचे खांब अचानक कोसळले. त्यामुळे गावातील विजेचा पुरवठा बंद झाला आहे. सुदैवाने यावेळी त्याठिकाणी कोणी नसल्याने जीवीतहानी झाली नाही. दरम्यान, गावातील जूने विजेचे खांब बदलावे यासाठी ग्रामस्थ गेली अनेक वर्षे मागणी करीत होती.
खाड्याचा पाडा या गावात 150 घरांची वस्ती असून या गावामध्ये 30 वर्षांपूर्वी उभारलेले लोखंडी विजेचे खांब अजुनही कायम आहेत. हे खांब पावसाळ्यात भिजून पुर्णतः गंजले होते. ते विजेचे खांब बदलण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून सातत्याने महावितरणकडे केली जात होती. परंतु, महावितरणचे कर्जत उपअभियंता आणि कळंब येथील सहाय्यक अभियंता यांच्याकडून कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे स्थनिकांना आपला जीव मुठीत धरून या जिर्ण विजेच्या खांबाजवळून जावे लागत होते. अखेर धोकादायक स्थितीत असलेले विजेचे खांब अचानक कोसळले. त्यावेळी गावात असलेल्या शुभ कार्यासाठी मंडप बांधण्याचे काम सुरू होते. सुदैवाने त्यावेळी तेथे कोणीही नसल्याने मोठा अपघात टळला. हे जीर्ण विजेचे खांब विद्युत तारांमुळे उभे होते. सध्या संध्याकाळी चांगला वारा सुटत असल्याने हे खांब एकामागून एक कोसळण्याची घटना घडत आहे. दरम्यान, महावितरणकडून खाड्याचा पाडा गावात सिमेंटचे नवीन खांब बसवले जाणार असून हे खांब बसवण्याची कार्यवाही महावितरण कंपनीने वेगाने करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
खाड्याचा पाडा गावातील विजेचे खांब कोसळले….
