चार प्रवासी अर्धा तास अडकले, भीतीचे वातावरण
। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सोमवारी (दि.20) सकाळी प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरील लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने चार प्रवासी तब्बल अर्धा तास अडकून पडले. रेल्वे पोलीस आणि तांत्रिक टीमच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असला तरी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हार्बर लाइनवरील या व्यस्त जंक्शनवर दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात, तरी लिफ्टच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह उपटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी नऊ वाजता चार प्रवासी प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी लिफ्टमधून खाली येत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि लिफ्ट दोन मजल्यांच्या मध्यभागी बंद पडली. दरवाजे लॉक झाले, हवा खेळती राहिली नाही आणि प्रवाशांना गुदमरल्यासारखे वाटू लागले. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. ही बाब कळताच कर्तव्यावरील रेल्वे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी लिफ्ट टेक्निशियनला बोलावले आणि सुमारे 30 मिनिटांच्या प्रयत्नांनंतर हाताने दरवाजे उघडून सर्वांना सुखरूप बाहेर काढले. बाहेर येताच प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. प्राथमिक तपासणीत कोणालाही गंभीर दुखापत झाल्याचे निदान नाही.
लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकल ट्रेनच्या गर्दीत ही घटना घडल्याने प्रवाशांमध्ये संताप आणि भीती वाढली आहे. एका प्रवाशाने सांगितले, “आम्हाला गुदमरल्यासारखे वाटत होते. लिफ्टची नियमित तपासणी का होत नाही?” दुसऱ्या प्रवाशाने म्हटले, “पनवेल हे मोठे जंक्शन आहे, अशा बिघाडामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय.” रेल्वे प्रशासनाने प्राथमिक माहिती दिली असली तरी लिफ्ट ‘कोसळली’ की ‘बंद पडली’ याबाबत स्पष्टता केलेली नाही. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून तांत्रिक विभागाने लिफ्टची तपासणी सुरू केली आहे.
या आधीही पनवेल स्थानकावर लिफ्ट आणि एस्केलेटरच्या बिघाडाच्या घटना घडल्या आहेत. प्रवाशांच्या तक्रारी वाढत असताना देखभाल आणि दुरुस्तीवर (मेंटेनन्स) प्रश्न उपस्थित होत आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लिफ्टची नियमित तपासणी केली जाते, पण तांत्रिक दोष सुधारण्यासाठी पावले उचलली जातील. प्रवासी संघटनांनी मात्र स्थानकप्रमुखांकडे तक्रार नोंदवली असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपायांची मागणी केली आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनावर जबाबदारी वाढली आहे.
