25 ते 31 मे दरम्यान राज्यभरात आंदोलने, मोर्चे
। मुंबई । प्रतिनिधी ।
जनतेची दैन्यावस्था क रणार्या महागाई आणि बेरोजगारीविरुद्ध डाव्या पक्षांनी 25-31 मे दरम्यान देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन महाराष्ट्रात जोरदारपणे यशस्वी करावे, अशी हाक राज्यातील डाव्या पक्षांनी दिली आहे. 23 मे रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, लाल निशाण पक्ष आणि भारताचा कम्युनिस्ट पक्ष (माले-लिबरेशन) यांच्या राज्यस्तरीय ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. झूम प्रणालीद्वारे ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
25-31 मे दरम्यान राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयांवर जनतेच्या वतीने उग्र मोर्चे आणि निदर्शने करत केंद्रातील भाजपच्या जनताविरोधी, कॉर्पोरेटधार्जिण्या आणि धर्मांधतेला उत्तेजन देणार्या धोरणाचा निषेध करावा, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. बैठकीस माकपचे डॉ. अशोक ढवळे, डॉ. उदय नारकर, डॉ. एस. के. रेगे, भाकप चे तुकाराम भस्मे, प्रकाश रेड्डी, प्रा. राम बाहेती, सुभाष लांड, शेकाप चे राजू कोरडे; लानिप चे भीमराव बनसोड, राजेंद्र बावके, भाकप (माले) लिबरेशन चे श्याम गोहिल व अजित पाटील उपस्थित होते. या आंदोलनात संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा, जन आंदोलनांची संघर्ष समिती, इत्यादीही सहभागी होत आहेत.
या आंदोलनाच्या निमित्ताने डाव्या पक्षांनी राज्यकर्त्यांकडे खालील मागण्या केलेल्या आहेत. यामध्य पेट्रोलियम पदार्थांवरील सर्व प्रकारचे सेस / सरचार्ज मागे घ्या,सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत गव्हाचे वितरण पूर्ववत करा,सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत सर्व जीवनावश्यक वस्तू, विशेषतः डाळी आणि खाद्यतेलाचा पुरवठा झालाच पाहिजे. आयकर लागू नसलेल्या सर्व कुटुंबांना दरमहा रु. 7,500 हस्तांतरित करा, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या तरतुदीत वाढ करा. बेरोजगार भत्ता देण्यासाठी केंद्रीय कायदा करा,शहरी भागासाठी रोजगार हमी योजनेचा कायदा करा. सर्व रिक्त जागा त्वरित भरा अशी मागणी या निवेदनाद्वारे डाव्या पक्षांतर्फे सरकारला करण्यात आली आहे.
भारतीय शेतकरी कामगार पक्ष या आंदोलनात सहभागी असून, हे आंदोलन डाव्या पक्षांना सोबत घेऊन संयुक्तपणे किंवा तसे शक्य नसल्यास स्वतंत्रपणे आयोजित करून यशस्वी करावे.
अॅड राजेंद्र कोरडे, कार्यालयीन चिटणीस