खालापूर टोलनाक्याजवळ इतर भाषांचा फलक; महामंडळाने तातडीने दखल घेण्याची मागणी
| अलिबाग | प्रतिनिधी |
एकीकडे महाराष्ट्र शासन आणि मराठी भाषिक जनता मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात भाषेच्या दर्जामुळे गौरवान्वित होत असताना, दुसरीकडे याच शासनाच्या अखत्यारितील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मात्र आपल्याच राज्यात मराठी भाषेची अवहेलना करत असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर, खालापूर टोल नाक्याच्या अलीकडे असलेल्या फूड मॉलच्या जवळ लावलेल्या माहिती फलकावरून मराठी भाषेला अक्षरशः नगण्य स्थान देण्यात आले आहे.
पुणे ते मुंबई प्रवासादरम्यान खालापूर टोल नाक्याच्या अलीकडे असलेल्या या फूड मॉलमध्ये आणि तेथील परिसरातील इतर ठिकाणी दररोज हजारो मराठी भाषिक पर्यटक थांबतात. मात्र, तिथे एमएसआरडीसीने लावलेल्या माहिती फलकावर मराठीचा मोठा अभाव जाणवतो. धक्कादायक बाब म्हणजे, या फलकावर इंग्रजी आणि हिंदी भाषेसोबतच दक्षिण भारतीय भाषांपैकी तमिळ, कन्नड आणि तेलगू या भाषांचा समावेश करण्यात आला आहे. या संपूर्ण फलकावर केवळ महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि वाहन तळ हे दोनच शब्द मराठीत आढळतात, तर फलकावरील इतर सर्व महत्त्वाच्या सूचना केवळ इंग्रजी आणि हिंदी भाषेत आहेत.
या प्रकाराबाबत स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, सरकारी यंत्रणाच जर आपल्या भाषेचा आदर करणार नसेल, तर इतरांकडून काय अपेक्षा ठेवणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित महामंडळाने तातडीने या फलकाची दखल घेऊन, हा फलक प्राधान्याने मराठी भाषेत असावा, त्यावरील सर्व सूचना मराठीत ठळकपणे प्रदर्शित कराव्यात आणि मराठीची होणारी ही अवहेलना त्वरित थांबवावी, अशी मागणी जोर धरत आहे. या प्रकरणावर एमएसआरडीसी प्रशासन आता काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या राज्यात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे, तिथे हा फलक प्राधान्याने मराठी भाषेत असणे अपेक्षित असताना, सरकारी महामंडळाकडून मराठीला अशा प्रकारे केवळ नगण्य स्थान देऊन इतर भाषांना झुकते माप दिले आहे.
संजय राऊत
महाराष्ट्र शासन प्रशासकीय स्तरावर मराठी भाषेचा वापर अनिवार्य करण्याचे आदेश वारंवार देते. असे असतानाही सरकारी महामंडळाकडून मराठीला इतके नगण्य स्थान देणे, हा मराठी अस्मितेचा आणि अभिजात भाषेचा अपमान आहे. आम्ही महाराष्ट्रात आहोत की अन्य कोणत्या राज्यात? जर फलक महाराष्ट्रात आहे, तर त्यावर मराठी भाषेलाच सर्वोच्च प्राधान्य का नाही?
ज्येष्ठ सनदी लेखापाल, अलिबाग







