ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश
| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील केगाव ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे. माजी ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील यांच्यावर ग्रामनिधीचा अपहार, आर्थिक गैरवापर आणि ग्रामपंचायतीच्या मूळ दस्तऐवजांमध्ये कथित बनावट कागदपत्रांचा समावेश केल्याप्रकरणी तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी उरणचे गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास संबंधित गटविकास अधिकाऱ्यांवरही शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आल्याने पंचायत विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
2017 मध्ये केगाव ग्रामपंचायतीत ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असताना वैभव पाटील यांच्या कार्यकाळातील आर्थिक व्यवहारांमध्ये लाखो रुपयांच्या अनियमिततेचा संशय व्यक्त करण्यात आला होता. ग्रामनिधीचा कथित अपहार, निधीचा गैरवापर तसेच ग्रामपंचायतीच्या मूळ अभिलेखांमध्ये बनावट कागदपत्रांचा समावेश केल्याचे आरोप समोर आले होते. या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले होते.
मात्र, 18 सप्टेंबर 2019 रोजी सादर करण्यात आलेल्या चौकशी अहवालात फौजदारी कारवाईची शिफारस न करता केवळ प्रशासकीय कार्यवाही सुरू असल्याचा उल्लेख करण्यात आला. हा अहवाल समाधानकारक नसल्याचे मानून वरिष्ठ स्तरावर तो अमान्य करण्यात आला. यानंतर 1 जुलै 2026 रोजी झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रकरणाचा आढावा घेण्यात आला. प्राप्त तक्रारी आणि चौकशी अहवालाच्या आधारे वैभव पाटील यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी उरण गटविकास अधिकाऱ्यांना तातडीने वैभव पाटील यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून त्याचा अहवाल जिल्हा परिषदेला सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास संबंधित गटविकास अधिकाऱ्यांवरही शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे उरण तालुक्यासह पंचायत समिती आणि ग्रामपंचायत प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ग्रामविकास अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करा
सध्या वैभव पाटील हे खालापूर पंचायत समितीअंतर्गत सुधागड तालुक्यातील नवघर ग्रामपंचायतीत ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यावरील गंभीर आरोपांचा विचार करून त्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी खालापूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. या आदेशामुळे संबंधित विभागातही खळबळ उडाली आहे.
