नगरपरिषदेकडून अतिक्रमण जमीनदोस्त

। कर्जत । वार्ताहर ।
चार फाटा ते श्रद्धा हॉटेल (न्यू बिकानेर) रस्त्याचे काम सुरू झाले होते, मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूस अतिक्रमण होते, रस्त्याच्या कामास अडथळा ठरणारे अतिक्रमण नगरपरिषदेच्या धडक कारवाईमुळे जमीनदोस्त करण्यात आल्याने आता रस्त्याचे काम जलद गतीने होईल व बर्‍याच दिवसापासून रखडलेला रस्ता पूर्ण होईल. चार फाटा ते श्रद्धा हॉटेल (न्यू बिकानेर) रस्ता खूप खराब झाला होता. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ होती, हा रस्ता व्हावा यासाठी भिसेगाव मधील नागरिकांची मागणी होती, त्यासाठी भिसेगाव मधील नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाशी पत्रव्यवहार केला होता, याबाबत उपोषण ही करण्यात आले होते. तांत्रिक कारणामुळे रस्त्याचे काम रखडले होते, तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर एम एम आर डी ए मुंबई यांच्यामार्फत कर्जत चार फाटा ते श्रद्धा हॉटेल या रस्त्याच्या कामासाठी सुमारे 5 कोटी इतका निधी कर्जत नगरपरिषद यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता, त्या अनुषंगाने रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्या खाली येत असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला झालेली अतिक्रमणावर 21 ऑक्टोबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत यांनी कारवाई करून जमीनदोस्त केली होती. याच रस्त्यावर नगरपरिषद हद्दीत असलेल्या चारफाटा ते भिसेगाव (न्यू बिकानेर) रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण असल्याने रस्त्याच्या कामास अडथळा होत होता या अतिक्रमणावर दि.27 ऑक्टोबर रोजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले. यावेळी शहर अभियंता मनीष गायकवाड तसेच नगर रचना अभियंता लक्ष्मण माने, बाळा निकाळजे आदी कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version