। सुधागड-पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यात विकासाच्या नावाखाली होणार्या वृक्षतोडीमुळे आणि मोठ्या प्रमाणात अतिक्रमणामुळे परिसराचे पर्यावरणीय समतोल धोक्यात आले आहे. अनेक ठिकाणी पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बदलून उंच बंधारे बांधण्यात येत आहेत, ज्यामुळे नैसर्गिक नाले बंद होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे भविष्यात स्थानिकांना अनेक संकटांना सामोर जावे लागणार आहे.
सुधागड तालुक्यातील वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे नुकसान होत असून, त्यामुळे नैसर्गिक आपत्तीला खतपाणी मिळत आहे. विकासकांनी आपल्या व्यक्तिगत फायद्यासाठी पर्यावरणीय हानी करणारी कामे सुरू केली आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी पर्यावरणीय र्हास थांबवण्यासाठी तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वन विभागाने विकासाच्या नावाखाली होणार्या वृक्षतोडीवर त्वरित लक्ष देऊन प्रभावी कारवाई करावी. महसूल विभागाने बंगलो आणि शेतघरांच्या नावाखाली होणार्या अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी कडक नियम लागू करावेत, अशा प्रकारच्या मागण्या स्थानिकांमधून होत आहेत. मात्र, येथील पर्यावरणीय समस्यांवर वन विभाग आणि महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असून, वन विभाग फक्त तात्पुरत्या कागदपत्रीय कारवायांपुरते मर्यादित राहिला आहे. तर, महसूल विभाग अशा प्रकरणांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे.