दिवाळी संपली तरीही मिळेना आनंदाचा शिधा; 60 टक्के लाभार्थी वंचित

| पाली/बेनसे | प्रतिनिधी |

जिल्ह्यात आतापर्यंत फक्त 50 टक्के आनंदाचा शिधा पोहचला आहे. तर 8 तालुक्यांमध्ये चणाडाळ पोहचली नाही. मोठा गाजावाजा करत राज्य सरकारने या उपक्रमाची घोषणा केली होती; परंतु दिवाळी संपत आल्याने 100 रुपये किमतीत मिळणार्‍या आनंदाच्या शिधाकडे येथील ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे फक्त 40 टक्केच शिधा किटची विक्री झाली आहे.

आर्थिक उत्पन्न कमी असलेल्या कुटुंबांची दिवाळी आनंदात जावी म्हणून रायगड जिल्ह्यात 4 लाख 48 हजार किटचे वाटप केले जाणार होते. या किटमध्ये चणाडाळ, रवा, साखर, पामतेल असणार होते; मात्र, ज्या वेळेला गजर होती तेव्हा हा शिधा ग्राहकांकडे पोहचला नाही. पनवेल, मुरुड, अलिबाग, पेण, रोहा, कर्जत या सात तालुक्यांमध्ये सर्व वस्तुंसह 100 टक्के शिधा भाऊबिजेच्या दिवसापर्यंत पोहचला, पण त्याचे वितरण होऊ शकले नाही. तर दिवाळीच्या सुट्टीमुळे महाराष्ट्र कन्झुमर सप्लायर्स या पुरवठादाराचे कर्मचारी दिवाळी रजेवर गेल्यामुळे माणगाव, खालापूर, सुधागड, महाड, पोलादपुर, तळा, म्हसळा, श्रीवर्धन या तालुक्यांमध्ये शिधा पुर्ण कीटसह अद्यापही पोहचलेला नाही. यात चणाडाळसह अन्य वस्तु नाहीत.

सुट्टीनंतर कामावर परतलेले ट्रकचालक हा माल घेऊन रात्रीपर्यंत प्रत्येक तालुक्यात पोहचतील, अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. ज्या तालुक्यांमध्ये शिधा पोहचला आहे, त्या कीटमध्येही चणाडाळ नसल्याने 100 रुपये किंमतीत ग्राहक ते विकत घेण्यास नकार देत आहेत. दिवाळीनंतर हा शिधा घेऊन करणार काय, असा प्रश्‍न ग्राहक आता रेशनदुकानदारांना विचारू लागले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने महागाईच्या पार्श्‍वभूमीवर जनतेला दिलासा देण्यासाठी आनंदाची शिधा जाहीर केली होती. राज्यातील अनेक ठिकाणी आनंदाचा शिधा पोहचला आहे. परंतु रायगड जिल्ह्यातील 60 टक्के लाभार्थी हा आनंदाचा शिधापासून वंचित राहीले.

आनंदाचा शिधा कीटचे रायगड जिल्ह्यात 40 टक्के विक्री झालेली आहे. रायगड जिल्ह्यात सात तालुक्यांमध्ये आनंदाचा शिधा पोहचला आहे, तर उर्वरीत आठ तालुक्यांमधील गोदामापर्यंत आज रात्रीपर्यंत माल पोहचेल, आम्ही पुरवठादार संस्थेच्या संपर्कात असून आनंदाचा शिधा लवकरात लवकर पोहचवण्याचा प्रयत्न करीत आहोत.

मधुकर बोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी
Exit mobile version