| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील किरवली गावाच्या मागे असलेल्या टेकडीवर अनेक महिने खोदकाम सुरू आहे. त्या खोदकामाबद्दल स्थानिक रहिवाशांनी महसूल विभागाला पत्र देऊन माती वाहून येण्याची भीती व्यक्त केली होती. मात्र, महसूल विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने किरवली गावातील अनेकांच्या घरामध्ये पाणी आणि माती शिरली आहे. दरम्यान, या नुकसानीची माहिती घेण्यासाठी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी आणि तलाठी पोहोचले.
कर्जत तालुक्यातील किरवली महसूल गावाच्या हद्दीमध्ये टेकडी खोदण्याचे काम चालू आहे. गावाच्या वरच्या बाजूला पोकलन मशीनचया सहाय्याने खोदकाम केले जात असताना ते खोदकाम तात्काळ बंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी महसूल विभागाला लेखी पत्र देऊन केली होती. त्या अर्जावर दीपक सोणावळे, प्रकाश सोनवले, शरद गायकवाड, विजया सोणावले, रंजना सोनावळे, नीलिया गायकवाड, सुवर्णा गायकवाड, किरण गायकवाड, कल्पेश गायकवाड यांच्या सह्या आहेत. मात्र, प्रशासनाने त्या अर्जाकडे दुर्लक्ष केल्याने डोंगराची माती येणाऱ्या पहिल्याच पावसात खाली आली असून, अनेकांचे घरामध्ये ही माती गेली आहे.
याबाबत माहिती मिळताच त्या भागाची पाहणी करण्यासाठी तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांच्या आदेशाने मंडळ वैशाली पाटील, तलाठी वैशाली मांन्टे, तलाठी आकाश काळे तसेच कोतवाल सुनील गायकवाड यांनी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. किरवलीचे ग्रामस्थ राहुल गायकवाड, रोशन गायकवाड, शैलेंद्र जाधव, कल्पेश गायकवाड हे यावेळी उपस्थित होते. या पाण्यासोबत आलेल्या मातीमुळे किरवली गावातील 34 हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे.