वनविभागाने ठोस उपाययोजना करण्याची गरज
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
पश्चिम घाटाचा विस्तिर्ण पट्टा, विपुल जैवविविधता व डोंगरदर्यांनी वेढलेला आणि ऐतिहासिक वारशांचा ठेवा म्हणून रायगड जिल्हा ओळखला जातो. मात्र, येथे वारंवार लागणार्या वणव्यांमुळे वनसंपदा व पशु-पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सध्या पाली सुधागडसह रायगड जिल्ह्यात बेसुमार वनवे लागत आहेत. नष्ट होणारी सजीव सृष्टी व वनसंपदा पाहून चिंता सतावू लागली आहे.
जिल्ह्यात सध्या दुपारी उन्हाची काहिली व तीव्रता वाढत आहे. या वाढत्या तापमानाचा फटका पक्ष्यांना जास्त बसत आहे. अशातच डोंगर माळरानावर लागणारे वणवे घातक ठरत आहे. त्यांची दाणा-पाण्यासाठी दाही दिशा वणवण होत आहे. यासाठी मानवी वस्तीतदेखील येत आहेत. भूक आणि पाण्यावाचून तसेच यातून येणार्या तणावातून पक्ष्यांचे मृत्यू होण्याची शक्यता पक्षी अभ्यासक व तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
सजीव सृष्टीला धोका
नैसर्गिक व कृत्रिम वणव्यांमुळे सजीव सृष्टी धोक्यात येते. पर्यावरणाची प्रचंड हानी होते. प्रदुषण वाढते. येथिल जैवविवीधता संपुष्टात येते. सरटणारे जीव, किटक आणि झाडे-झुडपे, औषधी वनस्पती आगीमध्ये भस्मसात होतात. तसेच पक्ष्यांचे आणि गुरे-ढोरांचे अन्न नष्ट झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते. दुर्गम भागात राहणार्या आदिवासींनादेखील या आगीमुळे धोका संभवतो.
ऐतिहासिक वास्तू व किल्ल्यांचे नुकसान
वणव्यांमुळे जिल्ह्यातील अनेक छोटे-मोठे गड-किल्ल्यांचे व ऐतिहासिक ठेव्यांचे बांधकाम कमकुवत होऊन ते ढासळण्याची भीती असते. किल्ल्याच्या तटबंदीवर, बरुजांवर उगवलेले गवत जळाल्यामुळे त्यांचे नुकसान होते. वणवे लागल्यामूळे किल्ले व ऐतिहासिक वास्तूंवरील मोठ्या प्रमाणात वनसंपदा देखील नष्ट होत आहे.
ठोस उपाययोजनांची गरज
स्थानिक लोकांना व आदिवासींना वणव्याचे दुष्रिीणाम सांगून त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. प्रामुख्याने वनविभाग, निसर्गप्रेमी व आदिवासी विद्यार्थ्यांच्या मदतीने जनजागृती करण्याची गरज आहे. तसेच दृकश्राव्य माध्यमांद्वारे वणव्यांमुळे होणारी हानी सर्वांसमोर आणली गेली पाहिजे. लोकांनीदेखील स्वयंस्फूर्तीने वणवे रोखणे व स्वतः लावणार नाही यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
वणव्यामुळे महत्त्वाची जैवविविधता धोक्यात येते. मधमाशी तसेच इतर कीटक, रानफुले, मृदा आदींनादेखील प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या वणव्याची झळ बसते. वणवे रोखण्यासाठी वन विभागाकडून जनजागृती व प्रबोधन केले जाते. अत्याधुनिक फायर ब्लोअरद्वारे वणवे विझविले जातात. जळरेषा काढली जाते.