मुरुड पालिकेकडून नियमांचे उल्लंघन
| मुरूड | वार्ताहर |
मुरुड नगर परिषदेने बांधलेल्या व महसूल खात्याने आकारलेल्या दंडाची रक्कम भरलेल्या बोटींग क्लब इमारतीच्या डागडुजीवर विद्यमान मुख्याधिकारी लाखोंचा खर्च करुन नियमांचे उल्लंघन करीत असल्याची तक्रार करणारा एक अर्ज मुरुड शहरातील नागरिक उदय हरिश्चंद्र चौलकर यांनी मुरुड तहसीलदारांसह रायगडच्या जिल्हाधिकार्यांकडे दाखल केला आहे.
बोटींग क्लब इमारतीवर महसूल खात्याने 49, 550/-रु. रकमेचा दंड ठोठावला होता व तो नगरपरिषदेने भरला देखील होता. डागडुजीचे काम सुरू असतांना मुरुड शहरातील भोगेश्वर आळी (उत्तर विभाग) येथिल एका शिष्टमंडळाने त्याबाबत त्यांना कल्पना दिली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करीत आपण कोणास घाबरत नसल्याचे सांगत पुन्हा तीच चूक त्यांनी केली आहे. अशी बांधकामे सर्वसामान्य नागरिकांनी केल्यास ती अनधिकृत ठरवून त्यांच्याकडून दंडाची वसुलीही नगरपरिषदेकडून व महसूल खात्याकडून केली जाते. नगरपरिषदेच्या मिनी मार्केट -रु. 35021रु., अपार्टमेंट हॉटेल -36636/- हॉटेल व माहिती केंद्र -1,43429 असा एकूण 2 लाख15 हजार अठ्ठयाहत्तर इतक्या रकमेचा दंड आकारण्यात आला आहे.
स़दर रक्कम अद्याप वसूल करण्यात आली नाही.नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाची रक्कम दुप्पट तिप्पट वसुल केली जाते परंतु नगरपरिषदेने नियमांचे उल्लंघन करूनही ठोस कारवाई का केली जात नाही.असा सवाल उदय चौलकर यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.