तपासाच्या नावाखाली महिलेची सोन्याची चेन गायब
। अलिबाग । प्रतिनिधी ।
पोलीस असल्याची बतावणी करीत एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन गायब केली. सोन्याच्या दागिन्यांमुळे खून झाला आहे. मारेकर्याचा शोध घेत असल्याचे सांगून त्यांची फसवणूक केली. ही घटना बुधवारी सकाळी पोयनाड येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोयनाडमधील जमनागर येथील महिला बुधवारी सकाळी त्यांच्या मुलाच्या भांड्यांच्या दुकानाकडे जात होती. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पोयनाड येथील महावीर सोसायटीजवळ आल्या. त्यावेळी महिलेला रस्त्यात थांबवून बोलण्यात गुंतवले. बतावणी करीत पोलीस असल्याचा विश्वास संपादन केला. दागिन्यांमुळे चोरी झाली आहे. त्या मारेकर्यांचा शोध सुरू आहे. दागिने घालून फिरू नका, गळ्यातील चेन माझ्याकडे द्या असे सांगून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन लंपास केली. ही बाब लक्षात येण्यापूर्वी बोगस पोलीस तेथून पसार झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक म्हात्रे अधिक तपास करीत आहेत.