| पेण | प्रतिनिधी |
पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांची कालमर्यादेनुसार महाड ग्रामीण पोलीस ठाण्यात बदली झाली असून, त्यांच्याजागी महाड पोलीस ठाण्यातून पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानिमित्ताने पेण पोलीस ठाण्याच्या सभागृहात निरोप व स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुंद हे होते. कार्यक्रमात पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस पाटील, शांतता समितीचे सदस्य तसेच पोलीस कर्मचारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाचा गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्यशैली, शिस्तप्रियता आणि जनसंपर्क याबद्दल अनेकांनी भावना व्यक्त केल्या. नवीन नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी आपल्या भाषणात संदीप बागुल यांनी निर्माण केलेली शिस्त आणि कामकाजाची पद्धत कायम ठेवत नागरिकांच्या सहकार्याने उत्तम कार्य करण्याची ग्वाही दिली. तर, निरोप समारंभात बोलताना संदीप बागुल यांनी आपल्या कार्यकाळात पोलीस कर्मचारी, पत्रकार, शांतता समितीसदस्य, पोलीसपाटील आणि नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. भविष्यात पुन्हा पेणमध्येकाम करण्याची संधी मिळाल्यास आनंदाने ती स्वीकारेन, असेही त्यांनी सांगितले.







