। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील पाली भुतीवली धरण बाधित शेतकरी हे शेतीसाठी पाणी मिळावे आणि कालव्यांची कामे वेगाने पूर्ण व्हावीत, या मागणीसाठी शेतकर्यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. हे शेतकरी सोमवार दि.24 मार्चपासून कर्जत येथील प्रशासकीय भवनाबाहेर उपोषणाला बसणार आहेत. त्याबाबत 20 गावातील शेतकर्यांनी बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
कर्जत-नेरळ रेल्वे पट्ट्यातील जमीन ओलिताखाली यावी आणि परिसर बाराही महिने हिरवागार राहावा यासाठी पाली-भुतिवली धरण लघुपाटबंधारे प्रकल्प बांधण्यात आला होता. या धरणाचे मुख्य प्रयोजन हे धरणातील पाणी परिसरातील 20 गावातील शेतकर्यांच्या सुमारे 1100 हेक्टर जमिनी सिंचनाखाली येऊन दुबार शेती करण्यासाठी दिले जाणार होते. मात्र, शासन स्तरावर पाली-भूतिवली धरणाचे पाणी तळोजा एमआयडीसीला देण्याचे शासन स्तरावरून ठरविण्यात आले आहे. जर अशा प्रकारे स्थानिक शेतकर्यांना डावळून पाणी एमआयडीसीला दिल्यास धरण परीसरातील गावांतील शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार आहेत. त्यासाठी शासनाच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी पाली भुतिवली धरण बचाव शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने 24 मार्च रोजी कर्जतमधील प्रशासकीय भवन येथे उपोषणाला बसण्याचा निर्णय प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी घेतला आहे.