। खोपोली । प्रतिनिधी ।
सोयाबीन-कापूस भाव फरक, पीक विमा यासह संपूर्ण सातबारा कोरा करा, अशा मागण्यांबाबत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी सरकारला 18 मार्चचा अल्टिमेट दिला होता. परंतु, अर्थसंकल्पीय आधिवेशानात सरकारने दखल न घेतल्यामुळे कर्जाचा बोजा असलेले शेतकर्यांचे सातबारे व सोयाबीन, कापूस अरबी समुद्रात बुडविण्यासाठी ते मुंबईकडे निघाले होते. मात्र, तुपकर हे बुधवारी (दि.19) खालापूरात येथे पोहचले असता पोलिसांनी तुपकरांसह प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी तुमपकर म्हणाले की, आम्हाला खालापूरात पोलिसांनी अडवले असले तरीही काही कार्यकर्ते गनिमिकाव्याने मुंबईत पोहचून त्यांनी आरबी समुद्रात कर्जाचे सातबारे बुडवले आहेत. त्यामुळे आमचे आंदोलन यशस्वी झाले असल्याचे सांगत सरकारने आमचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही रविकांत तुपकरांनी दिला आहे.