। नागोठणे । वार्ताहर ।
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने आपल्या वर्धापन दिनानिमित्त ‘सुरक्षित तट-समृद्ध भारत’ या संकल्पनेवर आधारित एक अभिनव सायकल मोहिमेचे अर्थात सायक्लोथॉनचे आयोजन केले आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते 7 मार्च रोजी आभासी पद्धतीने या मोहीमेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. गुजरातमधून या सायकल रॅलीला सुरुवात झाली असून 21 मार्च रोजी रॅली कोकणातील नागोठणे नंतर लोणेरे येथे दाखल होणार आहे. त्यानंतर पुढे दापोली, दाभोळ होऊन 22 मार्च रोजी रत्नागिरीत या रॅलीचे आगमन होणार आहे. त्यासाठी कोकणात जागोजागी या रॅलीचे जोरदार स्वागत करण्याची तयारी केली जात आहे.
या मोहिमेत सहभागी झालेले सायकलपटू देशाच्या 6553 कि.मी. लांबीच्या किनारपट्टीलगत सायकलने प्रवास करतील. या सायकलपटूंना दोन पथकांमध्ये विभागले गेले असून, ती एकाच वेळी पश्चिम किनारपट्टीवर गुजरातच्या कच्छ इथल्या लखपत किल्ला आणि पूर्व किनारपट्टीवर पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणामधील बखाली, इथून त्यांनी प्रस्थान केले आहे. ही दोन्ही पथके 25 दिवसांच्या साहसी प्रवासानंतर 31 मार्च 2025 रोजी तमीळनाडूत कन्याकुमारी स्मारकाजवळ एकत्र येतील.