| उरण | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात प्रस्तावित तिसऱ्या मुंबई प्रकल्पाविरोधात शेतकरी, भूमीपुत्र आणि ग्रामस्थांनी पुन्हा एकदा संघर्षाची भूमिका घेतली असून, नवनगर विरोधी समिती, रायगडच्या वतीने येत्या रविवार, 7 जून रोजी सायंकाळी 4 वाजता चिरनेर शहीद स्मारक येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
‘आपली जमीन, आपले हक्क, आपले भविष्य’ या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आलेल्या या सभेत तिसऱ्या मुंबई प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकरी, ग्रामस्थ आणि भूमीपुत्रांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सभेस मा. न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून, तिसऱ्या मुंबई प्रकल्पाच्या परिणामांबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत.
नवनगर विरोधी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, तिसऱ्या मुंबईच्या नावाखाली रायगड जिल्ह्यातील सुपीक शेती, गावे, घरे आणि स्थानिकांचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून विकासाच्या नावाखाली स्थानिकांना विस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही समितीकडून करण्यात आला आहे. समितीने स्पष्ट भूमिका घेत, नाही, नाही, कधीही नाही… आमच्या जमिनी देणार नाही अशी घोषणा दिली आहे. तसेच शेती, घरे, गावांसह आमचे अस्तित्व संपवू पाहणाऱ्या तिसऱ्या मुंबईची एकही वीट रचू देणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.
रायगडमधील शेतकरी, महिला, युवक आणि विविध सामाजिक संघटनांनी या सभेला उपस्थित राहून आपल्या हक्काच्या जमिनी, गावे आणि भविष्यासाठी एकजूट दाखवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तिसऱ्या मुंबई प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता लक्षात घेता, चिरनेर येथील या सभेकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.







