। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल मधील विंधणे परिसरातील कोनार्क हेवन सोसायटीमध्ये जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोन तरुणांनी येथील सुनील मोहिते (51) व समीर मोहिते (23) या पिता-पुत्रावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आल्यावर पोलिसांनी शाकीर शब्बीर खान (24) आणि सिद्धांत प्रवीण मोरे (23) या दोघांना अटक करण्यात आली.
मोहिते पिता-पुत्र, शाकीर खान आणि सिद्धांत मोरे हे सर्व कोनार्क हेवन सोसायटीमध्ये राहतात. पनवेलमधील विंधणे परिसरातील गेल्या वर्षी दिवाळीदरम्यान दारू पिण्याच्या क्षुल्लक कारणावरून शाकीर खान, सिद्धांत मोरे व समीर मोहिते यांच्यात वाद होऊन भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून शाकीर व सिद्धांत यांनी गेल्या शनिवारी मध्यरात्री समीरला शिवीगाळ केल्याने त्यांच्यात भांडण सुरू झाले. यावेळी सिद्धांत याने समीर याला पकडून ठेवले, तर शाकीर याने समीरवर चाकूने वारे केले. सोबतच समीरच्या वडीलांवरही चाकूचे वार करून जखमी केले. या घटनेनंतर या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर पनवेल तालुका पोलिसांनी शाकीर खान आणि सिद्धांत मोरे या दोघांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. तर, दुसरीकडे सिद्धांत शाकीर यांनी समीर व त्याचे वडील सुनील व विजय गायकवाड या तिघांनी मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे.
जुन्या भांडणाच्या रागातून पिता पुत्रावर जीवघेणा हल्ला
