पुन्हा बिबट्याची दहशत; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
बिबटयाच्या वाढलेल्या मुक्त संचारामुळे मंडणगड तालुक्यातील बोरथळ येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गावाजवळच्या जंगलात बिबट्याचा वावर वाढला असून शेतात जाण्यासाठी आणि या रस्त्याने प्रवास करण्यासाठी नागरिक घाबरत आहेत.

आडेफाटा बोरथळ परिसरातील सुकोंडी, मुर्डी, चाचवळ, ताडाचा कोंड, आडे, लोणवडी , वाघिवणे , चांदिवणे,सातांबा ,कोंगळे आदी गावांच्या हद्दीत दिवसाढवळया बिबट्याचे दर्शन होत लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या गावांच्या परिसरात बिबट्याचा वावर असला तरी त्याने हल्ल्या केल्याच्या घटना घडलेल्या नाहीत. मात्र, दिवसाढवळ्या बिबट्याचा सचार वाढल्याने नागरिकांमध्ये दहशत आहे.

दापोलीचे परिवनक्षेत्र अधिकारी वैभव बोराटे यांच्याकडे संपर्क साधला असता, अद्याप आपल्याला बिबटयाच्या वावराबाबतची माहिती मिळालेली नाही. कोणत्याही ठिकाणी बिबट्याचा वावर वाढला असेल तर त्या ठिकाणच्या नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी. रात्री घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी. हातात काठी व आवाज होण्यासाठी मोबाईलवर गाणे लावून बाहेर पडावे.

पाळीव जनावरे बंदिस्त गोठयात ठेवावीत अफवा पसरवू नयेत. बिबट्या माणसाचा वावर टाळत असतो. जाणीवपूर्वक हल्ला करत नाही. त्याला धोका वाटला तरच तो हल्ला करतो. त्यामुळे घाबरून जाऊ नये. बिबटयाच्या वावराची माहीती वन विभागाला द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Exit mobile version