। सातारा । प्रतिनिधी ।
सातारा जिल्ह्यातील फलटण येथून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन जीवन संपवले. डॉ. संपदा मुंडे असे या डॉक्टरचे नाव असून, जीवन संपवण्यापूर्वी डॉक्टरने हातावर सुसाईड नोट लिहिली होती. या नोटमध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांचे नाव असून, या घटनेनं साताऱ्यासह राज्याभरात खळबळ उडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. संपदा मुंडे या फलटण उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर म्हणून सेवा देत होत्या. त्यांनी गुरुवारी (दि. 23) रात्री शहरातील एका हॉटेलमध्ये टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जीवन संपवण्यापूर्वी डॉक्टर संपदाने हातावर मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या पोलिसांची नावे देखील लिहून ठेवली होती. पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याने माझ्यावर चार वेळा अत्याचार केला, तर पोलीस प्रशांत बनकर याने मला मानसिक त्रास दिला, असे संपदाने हातावर लिहून ठेवले आहे. याप्रकरणाने उपजिल्हा रुग्णालयात खळबळ उडाली असून पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.






