निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याआधी कामाला सुरुवात
| अलिबाग | प्रतिनिधी |
निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यादेश वर्कऑर्डर दिल्याशिवाय कोणतेही काम सुरू करता येत नाही. परंतु, अलिबाग तालुक्यातील चौल ग्रामपंचायतीच्या हद्दीत एमएमआरडीए अंतर्गत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामाचे निविदा मागविण्याची अंतिम तारीखही अद्याप उजाडली नसताना पंधरा दिवस आधीच कामे सुरू असल्याने जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात काही अर्थपूर्ण साटेलोटे आहे का, याबाबत संशय व्यक्त करण्यात येत असून, याबाबतची चौकशी होणे गरजेचे आहे, असे येथील नागरिकांचे मत आहे.
चौल ग्रामपंचायत हद्दीत चौलनाका, भाटगल्ली, तुलाडदेवी, एसनाईक आळी परिसरात रस्त्याच्या दुतर्फा गटाराचे काम करण्यासाठी एमएमआरडीए अंतर्गत जिल्हा परिषदेला निधी मंजूर करण्यात आला आहे. जवळपास 99,99,742 रुपये येथील गटाराच्या कामासाठीच खर्च करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा परिषदेमार्फत नोंदणीकृत खुला कंत्राटदारांकडून ई-निविदा मागविण्याची कार्यवाही सध्या सुरु आहे. या कामासाठी दि.10 ऑक्टोबरपासून निविदा मागविण्यात आल्या असून, अंतिम दिनांक 24 ऑक्टोबरपर्यंत आहे. त्यानंतर कंत्राटदारांकडून मागविण्यात आलेल्या ई-निविदा 25 ऑक्टोबर रोजी उघडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणजे, निविदा उघडल्यानंतर आठ-दहा दिवसांत वर्कऑर्डर देऊन संबंधित काम योग्य त्या ठेकेदाराला देण्यात येते, असा नियम आहे. परंतु, याठिकाणी संबंधित कामाची निविदा प्रक्रियादेखील अद्याप पूर्ण होणे बाकी असताना, आधीच काम सुरू कसे? यामागचे नक्की गौडबंगाल काय? या चर्चांना उधाण आले आहे.
वर्कऑर्डर देण्यात आलेली नसतानाही गटाराची कामे सुरू करण्यात आलेली आहेत. त्याबाबत कायदेशीर प्रक्रिया झाल्या आहेत का, त्याची कोणतीही तपासणी झालेली नसताना, अशा पद्धतीने जिल्हा परिषदेचे अधिकारी ठेकेदारावर मेहरबान का? असा सवाल चौलकरांकडून करण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेचे अधिकाऱ्यांना काम सुरू असल्याचे माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ज्यांच्या आदेशाने या कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे, तेच अधिकारी कामाबाबत अनभिज्ञ कसे असू शकतात, नक्की यामध्ये कोण कोणाची पोळी भाजण्याचे काम करतेय, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
आधीच ठेकेदार कसे ठरले?
एखादा ठेकेदार मलाच काम मिळेल हे कसे काय समजू शकतो. निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याअगोदर ठेकेदाराला आधीच कसे काय कळतेय की त्याला काम मिळणार आहे. आणि, तसे समजून तर चौलमध्ये कामे सुरू नाहीत ना, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
चौल तुलाडदेवी, भाटगल्ली असो वा एसनाईक आळी येथील अंतर्गत गटारांची कामे आधीच करण्यात आली आहेत. त्यामुळे निविदेमध्ये दाखविण्यात आलेली कामे कुठे आणि कशी करणार आहेत. कामांची बोगसगिरी खपवून घेणार नाही. वेळीच याविरोधात आवाज उठवून जशास तसे उत्तर देणार.
– सुरेंद्र म्हात्रे, जिल्हाध्यक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
वर्कऑर्डरशिवाय कोणतीही कामे करता येत नाही. परंतु, जर अशी कामे कुठे सुरू असतील, तर त्याबाबत माहिती घेण्यात येईल. योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
– सत्यजीत बडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, राजिप






