राष्ट्रवादीचे जयेंद्र भगत यांचा सहभाग असल्याची चर्चा
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील वाडगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एका राजकीय पुढाऱ्याने भेकराच्या मांसाची तस्करी केल्याची घटना उघडकीस आली आहे. अलिबाग पोलिसांनी गुरुवारी (दि.23) सायंकाळी छापा टाकून ते मांस जप्त केले. दरम्यान, संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
मिळालेल्या माहितीनुसार, जयेंद्र भगत असे या राजकीय पुढाऱ्याचे नाव असून, खासदार सुनील तटकरे यांच्या अगदी जवळचे कार्यकर्ते आहेत.
जयेंद्र भगत यांनी मागील चार दिवसांपूर्वी वनसंवर्धनाचा गाजावाजा करत एक शासकीय कार्यक्रम महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करून घेतला. मात्र, गुरुवारी सायंकाळी त्यांच्या घरात भेकर या वन्यप्राण्याचे मांस असल्याची माहिती अलिबाग पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून मांस तस्करीचा पंचनामा केला. त्यानंतर ते मांस ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, ते मांस भेकर या प्राण्याचे असल्याचे अद्याप निष्पन्न झालेले नाही. याबाबत अलिबाग पोलिसांनी वनविभागाची मदत घेतली आहे. संशयित भेकर प्राण्याचे मांस कुठून आले, असा सवाल जनमानसातून उपस्थित केला जात आहे. वनविभागदेखील या घटनेबाबत स्पष्ट बोलण्यास टाळाटाळ करीत असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.







