पाझर तलावांमध्ये 50 टक्के जलसाठा

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

वाढते तापमान तसेच वाढत्या नागरिकीकरणामुळे पाण्याची मागणीदेखील झपाट्याने वाढू लागली आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या पाझर तलावांमध्ये सुमारे 50 टक्केच जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामध्ये 15 तलावांमध्ये अत्यल्प पाणी आहे. त्यामुळे नागरिकांनी जपून वापरण्याचे आवाहन जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे.

रायगड जिल्हा परिषद विभागाकडील लघुपाट बंधारे योजनेची नऊ तलाव आहेत. त्यामध्ये अलिबाग, रोहा, मुरूड माणगाव या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक असे एकूण चार, कर्जतमध्ये पाच बंधारे आहेत. या बंधाऱ्यांची पाणी साठवण क्षमता 6.444 दश लक्ष घन मिटर इतकी आहे. परंतु या बंधाऱ्यांमध्ये 3.334 दश लक्ष घन मिटर जलसाठा शिल्लक आहे. एकूण 50 टक्केच बंधाऱ्यांमध्ये पाण्याचा साठा शिल्लक राहिला असल्याची माहिती समोर आली आहे. या तलावांमधील जलसाठा कमी होऊ लागला आहे. त्यामध्ये सर्वात कमी जलसाठा मुरुड तालुक्यातील विहूर लघुपाट बंधारे तलाव, कर्जत तालुक्यातील बलिवरे लघुपाटबंधारे, नाधाल तलावांमध्ये 0.45पासून 441 दश लक्ष घन मिटर इतकाच साठा शिल्लक राहिला आहे. तसेच जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील 36 ठिकाणी जिल्हा परिषद विभागामार्फत तलावाची योजना राबविण्यात आली आहे. यामध्ये अलिबाग तालुक्यात तीन, पनवेलमध्ये दोन, पेणमध्ये एक व कर्जतमध्ये पाच, खालापूरमध्ये आठ, रोहामध्ये सहा, सुधागडमध्ये दोन, तळामध्ये एक, माणगावमध्ये सहा, म्हसळामध्ये दोन योजनाचा समावेश आहे. या तलावांच्या मदतीने ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करण्याचे काम ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे. या पाझर तलावांमधील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची पातळी कमी होऊ लागल्याने पाण्याचा तुटवडा अनेक गावांना निर्माण झाला आहे. या तलावांमध्ये सध्या 50 टक्के इतका पाणी साठा शिल्लक आहे.या तलावांच्या पाण्याची क्षमता 419.36 दशलक्ष घन मीटर आहे. मात्र सध्या तलावांमध्ये 209.68 दश लक्ष घन मीटर इतकेच पाणी शिल्लक राहिले आहे.

बिडवागळे, भाल, धामिनी, वाजापूर, गोविर्ले, खांडस, कशेेळे, खारआंबेली, लोधीवली, पहूर, सिध्देश्वर, उसडी, कोल्हण, विले या पाझर तलावांमध्ये अत्यल्प जलसाठा आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई भेडसावण्याची भिती निर्माण झाली आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर योग्य पध्दतीने करावा, असे आवाहन जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version