रासायनिक कारखान्यांना ठाम विरोध; उभारण्यासाठी स्वतंत्र कोर कमिटीची स्थापना
| माणगाव | प्रतिनिधी |
रोहा आणि माणगाव तालुक्यात डीएमआयसी अंतर्गत प्रस्तावित बल्क ड्रग पार्क (रासायनिक उद्योग प्रकल्प) विरोधातील जनआंदोलनाला आता अधिक संघटित स्वरूप प्राप्त झाले आहे. प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या सुमारे 11 ग्रामपंचायतींनी एकत्र येत या प्रकल्पाविरोधात लढा अधिक प्रभावीपणे उभारण्यासाठी स्वतंत्र कोर कमिटी स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रकल्प रद्द होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धारही ग्रामस्थांनी व्यक्त केला. शनिवारी (दि.2) भाले येथील श्रीराम मंदिरात सभापती विलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. बैठकीला परिसरातील ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन स्थापन करण्यात आलेल्या कोर कमिटीत बाधित 11 ग्रामपंचायतींतील सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधी, पर्यावरण व रासायनिक उद्योग विषयाचे जाणकार, तसेच शासनस्तरावर कायदेशीर आणि प्रशासकीय लढा देऊ शकतील अशा अभ्यासू व्यक्तींना सहभागी करून घेण्याचा ठराव करण्यात आला.
भविष्यातील सर्व आंदोलन, जनजागृती, निवेदने आणि कायदेशीर पाठपुरावा या कमिटीमार्फत समन्वयाने करण्यात येणार आहे. बैठकीत बोलताना उपस्थितांनी स्पष्ट केले की, बल्क ड्रग पार्कमधील रासायनिक उद्योगांमुळे पर्यावरण, शेती, जलस्रोत, जैवविविधता आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प परिसरात होऊ दिला जाणार नाही, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी मांडली. कोर कमिटीने संबंधित शासकीय विभाग, प्रदूषण नियंत्रण यंत्रणा आणि अन्य संबंधित कार्यालयांना लेखी निवेदने देऊन या प्रकल्पाला स्थानिकांचा ठाम विरोध असल्याचे अधिकृतपणे कळविण्याचा निर्णय घेतला.
सभेत उपस्थित ग्रामस्थांनी प्रकल्प रद्द होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, रासायनिक कारखाने नकोत अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. संघर्षाची तीव्रता वाढविण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी एकदिलाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. या बैठकीला बाबु खानविलकर, दीपक जाधव, राजाभाऊ रणपिसे, संदीप जाधव, विपुल उभारे, संजय कदम, सुधाकर शेडगे, सुधीर पवार, जनार्दन मानकर, सुनील जगताप, संजय खानविलकर, भागाराम मंचेकर, मारुती धनावडे, मधुकर कोदे, राजाराम गांगण यांच्यासह भाले, पानसई, निजामपूर, कडापे, जामगाव, पहूर, दाखणे, रातवड, भुवन, निलज आणि वावेदिवली या 11 ग्रामपंचायतींतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
