डिजिटल युगात ऑनलाइन फसवणूक

मेहनतीच्या पैशांवर डल्ला मारण्याचे जाळे; महाराष्ट्र सायबरचा सावधनतेचा इशारा

| उरण | प्रतिनिधी |

डिजिटल युगातील सुविधांचा फायदा घेत सायबर भामट्यांनी आता सामान्य नागरिकांच्या मेहनतीच्या पैशांवर डल्ला मारण्याचे जाळे विणले आहे. ऑनलाइन फसवणूक, बनावट लिंक, आमिष दाखवणारे संदेश आणि विविध डिजिटल क्लृप्त्यांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट सुरू असताना महाराष्ट्र सायबर, महाराष्ट्र शासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. एका क्षणाची निष्काळजी आयुष्यभराची कमाई लुटू शकते, त्यामुळे अनोळखी लिंकवर क्लिक करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा, असा इशार देखील त्यांच्याकडून देण्यात आला आहे.

सायबर गुन्हेगार नागरिकांना जाळ्यात ओढण्यासाठी नवनवीन युक्त्या वापरत आहेत. कधी आकर्षक आमिष, कधी बक्षिसाचे प्रलोभन, तर कधी बँक किंवा सरकारी कार्यालयाच्या नावाने संपर्क साधून गोपनीय माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला ओटीपी, एटीएम पिन, बँक खात्याचे तपशील किंवा पासवर्ड देऊ नयेत. संशयास्पद लिंक उघडू नयेत आणि अनोळखी व्यक्तींच्या सांगण्यावरून कोणतेही ऑनलाइन आर्थिक व्यवहार करू नयेत. सायबर फसवणूक कशी केली जाते आणि अशा गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याची माहिती देणारा जनजागृतीपर व्हिडिओ महाराष्ट्र सायबर विभागामार्फत नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा आणि कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच परिचितांपर्यंतही ही माहिती पोहोचवावी, असे आवाहन देखील महाराष्ट्र साबयर विभागातर्फे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यानंतर घाबरून गप्प बसू नका किंवा वेळ वाया घालवू नका. तात्काळ राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांक 1930 वर संपर्क साधून तक्रार नोंदवा. फसवणुकीनंतर जितक्या लवकर तक्रार केली जाईल, तितक्या लवकर संबंधित यंत्रणांना व्यवहार रोखण्यासाठी प्रयत्न करता येतील, असे देखील त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

तसेच, महाराष्ट्र सायबर विभागाने नागरिकांना अधिकृत माहिती आणि मार्गदर्शनासाठी आपल्या इन्स्टाग्राम, फेसबुक, एक्स आणि यूट्यूब या समाजमाध्यम खात्यांना फॉलो करण्याचेही आवाहन केले आहे. डिजिटल व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे, गोपनीय माहिती सुरक्षित ठेवणे आणि संशयास्पद व्यवहारांची त्वरित तक्रार करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आज सायबर भामटे घरात घुसत नाहीत, कुलूप तोडत नाहीत; ते थेट मोबाईलच्या पडद्यावरून खात्यात हात घालतात. त्यामुळे फुकटच्या आमिषाला बळी पडू नका, अनोळखी लिंकवर विश्वास ठेवू नका आणि स्वतःची आर्थिक माहिती कोणाच्याही हाती देऊ नका. तुमचा एक ओटीपी, तुमचा एक क्लिक आणि तुमची आयुष्यभराची कमाई धोक्यात येऊ शकते. सायबर भामट्यांना बळी पडण्यापेक्षा आधीच सावध व्हा, सतर्क राहा, सुरक्षित राहा, असा संदेश महाराष्ट्र सायबर विभागाने दिला आहे.

Exit mobile version