डोंबिवली पुन्हा हादरली! केमिकल कंपनीला आग

| डोंबिवली | प्रतिनिधी |

डोंबिवलीतील एमआयडीसीमधील इंडो अमाईन्स या केमिकल कंपनीत आग लागल्याची घटना समोर येत आहे. यावेळी अनेक स्फोटांचे आवाजही येत असल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या आगीचे लोळ पाहून परिसरात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.

या घटनेनंतर बाजूला असणाऱ्या अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांनी घरी पाठवण्यात आलं आहे. आजूबाजूच्या परिसरातील कारखान्यातील कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. आग लागलेल्या कंपनीच्या परिसरात अनेक विविध कारखाने आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आगीवर नियंत्रण मिळवण्याची गरज आहे. सदर घटनेनंतर परिसरातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवासांमध्ये डोंबिवलीतील एमआयडीमध्ये आगीच्या अनेक घटना घडत आहे. मात्र यानंतरही राज्य सरकारने धडा घेतला नाहीय का?, अशा सवालही नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. साधारण 15 दिवसांपूर्वीच या एमआयडीसीमधील एक मोठा स्फोट झाला होता. यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पुन्हा आग लागल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट पसल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version