झोपडीसह मच्छीमार जाळी जळून खाक
| रेवदंडा | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील थेरोंडा खंडेरावपाडा समुद्रकिनारी रविवारी (दि.9) रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास झोपडीला आग लागली. या आगीत झोपडीसह मच्छीमार जाळी जळून खाक झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
थेरोंडा खंडेरावपाडा समुद्रकिनारी दत्तात्रेय पोसणे यांच्या झोपडीला आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी खंडेरावपाडा ग्रामस्थ व विष्णू पोसणे आदींनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, या आगीमध्ये मच्छीमारीची जाळी जळून खाक झाली आहेत. ही आग कशामुळे लागली ते अद्याप कळू शकलेले नाही. या आगीची माहिती विष्णू पोसणे यांनी रेवदंडा पोलिस ठाण्यात दिली आहे. तसेच, या आगीबाबत व नुकसानीबाबत मत्सव्यवसाय विभागाकडे माहिती देण्यात आली असून, मत्सविभागाचे परवाना अधिकारी महादेव नांदोस्कर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. या आगीबाबत मच्छीमारांच्या जय मल्हार कोळी समाज संघटना अध्यक्ष गोरखनाथ नवरीकर यांनी खेद व्यक्त केला आहे. दरम्यान, ग्रामस्थांमधून पुन्हा समुद्रकिनारी सिसिटिव्ही कॅमेरा बसविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.