। मुरुड । वार्ताहर ।
मुरुड जंजिरा ( नितीन शेडगे) मच्छिमारांचे विविध प्रश्न सुटण्यासाठी नॅशनल फिशववर्कर्स फोरम व महाराष्ट्र कृती समितीच्या वतीने मच्छिमारांच्या न्याय हक्कासाठी मच्छिमार संघर्ष यात्रा सुरु झाली आहे.दिनांक 24 जून ते 29 जून या कालावधीत पालघर येथील झाई ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या परिसरातून संघर्ष यात्रा जाणार असून या संघर्ष यात्रेचे आगमन मुरुड येथे 28 जून रोजी होणार असून त्यांच्या स्वागतासाठी असंख्य मच्छिमार उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे रायगड जिल्हा अध्यक्ष मनोहर बैले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे.
संघर्ष यात्रेची जाहीर सभा मुरुड येथे सकाळी 9 वाजता होणार असून स्थानिक मच्छिमारांचे प्रश्न पदाधिकारी समजून घेणार आहेत.संघर्ष यात्रेचा उद्देश असा आहे कि, मच्छिमारांचे प्रलंबित प्रश्न राज्य व केंद्र सरकारकडून लवकरात लवकर सुटावेत व शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हि संघर्ष यात्रा असल्याची माहिती मनोहर बैले यांनी दिली आहे.
एलईडी व पर्ससीन मासेमारीवर बंदी आणावी, एलईडी करताना बोट सापडल्यास फक्त दंडात्मक कार्यवाही केली जाते.हे आम्हाला मान्य नसून या पुढे अश्या नौकांचे व्ही.आर.सी.व मासेमारी परवाना रद्द करणे नौका जप्तीच्या कायद्यात सुधारणा करावी.मागील चार वर्षांपूर्वीचा 300 कोटी रुपयांचा डिझेल परतावा त्वरित अदा करण्याचे यावा.एनसीडीसी व इतर थकीत कर्जावरील व्याज व मुद्दल माफ करण्यात यावी.मच्छिमार घरासाठी वापरात असणार्या जमिनीचे सातबारे उतारे मच्छिमारांच्या नावे करावेत.मासळी बाजार सुरक्षित ठेवण्यासाठी कायदा करावा व प्रत्येक तालुक्यात व जिल्ह्यात मध्यवर्ती ठिकाणी मासळी मार्केट उभारावे अश्या अनेक मागण्या असून संघर्ष यात्रेद्वारे आम्ही शासनाकडे लक्ष्य वेधून घेणार असल्याची माहिती यावेळी बैले यांनी दिली.
सदरील सभेसाठी महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो,कार्याध्यक्ष रामकुष्ण तांडेल,सरचिटणीस किरण कोळी,ज्योती मेहेर रविकांत तोरोस्कर जॅकसन पी.उपस्थित राहणार असल्याची माहिती बैले यांनी दिली आहे.