लाकडी बोटीऐवजी फायबर बोटींची वाढती पसंती
| रायगड | प्रतिनिधी |
बदलत्या काळानुसार रायगड जिल्ह्यातील पारंपरिक मासेमारी व्यवसायाने आता आधुनिकतेची कास धरली आहे. उरण परिसरातील करंजा, मोरा आणि इतर प्रमुख बंदरांमध्ये सध्या लाकडी बोटींच्या तुलनेत फायबर बोटींची उभारणी मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे चित्र दिसत आहे. खर्चिक देखभाल आणि लाकडाची टंचाई यांमुळे मच्छीमार आता फायबर तंत्रज्ञानाकडे वळत आहेत.
पूर्वी खोल समुद्रात मासेमारीसाठी लाकडी बोटींचाच मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता. या बोटींसाठी बाभूळ आणि महागडे सागवान लाकूड लागते. मात्र, वाढता खर्च आणि लाकडाची कमतरता यामुळे मच्छीमारांसमोर अडचणी निर्माण होत होत्या. अंदाजे 90 टन क्षमता असलेल्या एका लाकडी बोटीच्या बांधणीसाठी 75 ते 80 लाख रुपये खर्च येतो. त्याचबरोबर आवश्यक लाकूड उपलब्ध करून बोट पूर्ण तयार होण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागतो.
आर्थिक अडचणी आल्यास हा कालावधी आणखी वाढतो. उरण परिसरातील करंजा मोरा आणि इतर बंदरांमध्ये सध्या अनेक मच्छीमारांनी फायबर बोटींची निर्मिती सुरू केली असून, या बदलामुळे वेळ आणि पैशाची बचत होत आहे. परिणामी मासेमारी व्यवसायाला आधुनिकतेची नवी दिशा मिळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
फायबर बोटी फायदेशीर
फायबर बोटींची बांधणी कमी कालावधीत पूर्ण होते. या बोटी वजनाने हलक्या, अधिक टिकाऊ आणि देखभालीसाठी किफायतशीर ठरत आहेत. लाकडी बोटींच्या देखभालीसाठी दरवर्षी सुमारे 50 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो, तर फायबर बोटींच्या बाबतीत हा खर्च तुलनेने कमी आहे.
पर्यावरण संवर्धनाचा हेतू
याशिवाय लाकडी बोटींसाठी होणाऱ्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणावरही परिणाम होत असल्याची जाणीव आता मच्छीमारांना होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान टाळणे आणि व्यवसाय अधिक फायदेशीर करणे या दुहेरी उद्देशाने मच्छीमार फायबर बोटींचा स्वीकार करत आहेत.






