विक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण
| माथेरान | वार्ताहर |
मागील दोन वर्षे कोरोनामुळे गणेशोत्सवात फुलांना अगदी किरकोळ मागणी होती. मात्र, यावर्षी माथेरानमध्ये विविध फुलांना बाजारपेठेत मोठी मागणी वाढली आहे. यामध्ये झेंडू, शेवंती, गुलछडी, अष्टर, कापरी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पहिल्यांदाच यावर्षी ऑरकेटच्या फुलांच्या कंठीला जास्त मागणी आहे. फुलांच्या बाजार तेजीत आल्यामुळे येथील फुल विक्रेते समाधान व्यक्त करीत आहेत.
ऑरकेटच्या फुलांची कंठी 250 ते 300 रुपयांपर्यंत विक्री केली जात आहे. गुलछडी, सफेद, लाल शेवंती, झेंडू, अष्टरच्या फुलांचे हार 80 ते 100 रुपयांच्या पुढे याची विक्री होत आहे. माथेरानमध्ये फुलांचा सर्व माल हा कल्याणच्या बाजारपेठेतून येथे आणला जातो. येथे कोणतेही दळणवळणाचे योग्य साधन नसल्याने फुलांचा सर्व माल त्यांना स्वतः डोक्यावर घेऊन यावा लागतो. त्यामुळे माथेरानमध्ये फुलांचे वाढते दर पहावयास मिळतात, असे फुल विक्रेत्यांसाठी सांगण्यात येत आहे.
गेल्या वर्षीपेक्षा यंदा फुलांचा मालही चांगला आहे आणि फुलांना मागणीही अधिक आहे. या संपूर्ण गणेशोत्सवापर्यंत फुलांचे भाव असेच राहिले तर आम्हाला मोठा दिलासा मिळेल.
संपत फराट, फुल व्यावसायिक, माथेरान