। उरण । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील शेवा कोळीवाड्यातील प्रकल्पग्रस्त अनंत परदेशी (89) व कुटुंबियांचे पुनर्वसन बोरी पाखाडी येथील सरकारी खाजण स्मशान भूमीजवळ करण्यात आले होते. याठिकाणी परदेशी कुटुंब गेली 40 वर्ष वास्तव्यास आहे. मात्र, पुनर्वसित असून देखील परदेशी कुटुंबियांना शासनाच्या पुनर्वसन कायद्याअंतर्गत हव्या तशा नागरी सेवा व सवलती शासनाकडुन उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यातच या परिसरात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या देखील निर्माण झाली आहे. त्यासाठी परदेशी कुटुंबियांनी आमरण उपोषणाचा अवलंब केला होता. ते उरणच्या पंचायत समिती कार्यालयच्या आवारात सोमवारी (दि.17) आमरण उपोषणाला बसले होते.
या उपोषणाला विविध शासकीय कर्मचारी, अधिकारी संघटना, विविध सामाजिक संस्था, उरण मेडिकल असोसिएशन व सर्व पक्षीय कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी जाहिर पाठिंबा दिला होता. त्यामुळे वाढता तीव्र विरोध लक्षात घेता प्रशासनाने वेगाने सूत्र हलविली. यावेळी उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तथा प्रशासक विनोद मिंडे, ग्रामपंचायत अधिकारी विनोद मोरे यांनी मध्यस्थी करत हा प्रश्न गुरवार दि.20 मार्चपर्यंत सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. शासकीय अधिकार्यांनी आश्वासन दिल्याने परदेशी कुटुंबियांनी सुरु केलेले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे.