माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक

| मुंबई | प्रतिनिधी |
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर सभेतून शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने दळवी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

शिवसेना ठाकरे गटातर्फे रविवारी भांडुपमध्ये ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या महिंदुह्रदयसम्राटफ या उपमेवरून माजी महापौर दत्ता दळवी यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

सार्वजनिक सभेत संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अश्लील शिवीगाळ व अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना शिंदेगटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडुप पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार भांडुप पोलिसांनी माजी महापौर दत्ता दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, यावेळी मुलुंड न्यायालयाच्या बाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली होती. दत्ता दळवींच्या समर्थनार्थ त्यांनी घोषणाबाजी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका
ज्यांनी घरात बसून निर्णय घेतले, फेसबुक लाईव्हवरून बैठका घेतल्या, त्यांनी आपल्या कार्यपद्धतीवर टीका करू नये असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. ठाकरे गटाचे माजी महापौर दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्र्यावर टीका करताना आक्षेपार्ह भाषा वापरली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. खालच्या पातळीवर भाषा वापरणे हे आमच्या संस्कृतीमध्ये नाही आणि या महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. महाराष्ट्राला एक संस्कृती आहे, परंपरा आहे. जे घरात बसून काम करत होते, फेसबुक लाईव्हवरून काम करत होते त्यांनी माझ्यासारख्या मुख्यमंत्री कार्यकर्त्याला अशा प्रकारची शिकवण देणं योग्य नाही. त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल शरद पवार साहेबांनी देखील आपल्या पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे मी जास्त बोलू इच्छित नाही. त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने ही भाषा सुरू केली आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचं सांगत एकनाथ शिंदे म्हणाले की, गेल्या वेळी मराठा आरक्षण मिळालं होतं, पण ते सर्वोच्च न्यायालयात त्या वेळच्या सरकारला टिकवता आलं नाही. त्यामुळे आम्ही आता मराठ्यांना टिकणारं आरक्षण देणार आहोत. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी अथवा कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता ते दिलं जाईल. छगन भुजबळांची मागणीही तीच आहे.

Exit mobile version