कमिशनच्या आमिषापोटी लावला चुना

। पनवेल । वार्ताहर ।
पेडोंरा अ‍ॅपच्या माध्यमातून घरी बसल्या नोकरी करुन जास्त लाभ मिळविण्याचे आमिष दाखवून एका सायबर चोरट्याने पनवेलच्या डेरवली येथील एका तरुणाला तब्बल 10 लाख 18 हजार रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. पनवेल तालुका पोलिसांनी या प्रकरणी सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेत फसवणूक झालेला तरुण सनाऊल्ला जबीउल्ला खान (25) मुंब्रा येथे राहण्यास असून त्याचा पनवेल मधील डेरवली येथे फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. सनाऊल्ला खान पनवेल येथील आपल्या कामावर हजर असताना अज्ञात सायबर चोरट्याने विनीता या महिलेच्या नावाने त्याला घरी बसून नोकरी करा आणि मिळणार्या लाभाचा फायदा घ्या, अशा प्रकारचा व्हॉटस्अ‍ॅपवरुन मेसेज पाठविला. सदर मेसेजला सनाऊल्ला खान याने प्रतिसाद दिल्यानंतर सायबर चोरट्याने त्याला एक लिंक पाठवून दिली. सदर लिंक उघडण्यात आल्यानंतर पॅडोंरा नावाचे अ‍ॅप सुरु झाल्याचे आणि त्यात 88 रुपये शिल्लक असल्याचे सनाऊल्ला याच्या निदर्शनास आले. त्यानंतर सायबर चोरट्याने सांगितल्यानुसार सनाऊल्ला यांनी वेगवेगळ्या ऑर्डर केल्या होत्या. त्यावर त्यांना कमिशन मिळाले होते. परंतु या कमिशनची रक्कम खात्यातून निघत नव्हती. त्यावेळी त्याला सायबर चोरट्याने तब्बल 10 लाख 18 हजार रुपयांची रक्कम पॅडोंरा अकाऊंटमध्ये भरण्यास सांगितल्या प्रमाणे त्याने ती भरली. तरीही कमिशनची रक्कम निघत नसल्याने त्याने सायबर चोरट्याच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला असता समोरील व्यक्तीने राँग नंबर असल्याचे सांगून फोन बंद केला. त्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर सनाऊल्ला खान याने पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Exit mobile version