। अलिबाग । प्रतिनिधी ।
आधारकार्डचा गैरवापर झाल्याची बतावणी करून अलिबागमधील गोंधळपाडा येथील एका महिलेला विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने 40 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. शनिवारी (दि. 4) रात्री मोबाईलवर कॉल करून ही फसवणूक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
फिर्यादी महिला तिच्या घरात असताना अचानक रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास व्हॉट्सअॅप कॉल अज्ञाताने केला. टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथोरेटी ऑफ इंडियामधून बोलत असल्याचे सांगून तुमच्या आधारकार्डचा गैरवापर झाला आहे. मोबाईल फोन बंद होणार आहे, असे त्याने सांगितले. त्यानंतर त्याच नंबरवर पोलीस अधिकारी दीक्षित मॅडम आणि विश्वास नांगरे पाटील बोलत असल्याचे सांगत तिचा विश्वास संपादन केला. तुमच्यावर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, ईडी आर.बी.आय, मुंबई पोलीस यांच्याकडील गुन्ह्यात अटक वॉरंट असल्याची भीती निर्माण केली. ईडी व इतर यंत्रणेच्या भीतीने ती महिला बोलकी झाली. जाळ्यात अडकल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी त्या महिलेचे बँकेतील सर्व माहिती घेऊन तिच्या बँक खात्यातून परस्पर ऑनलाईन 40 लाख 73 हजार 719 रुपये गायब केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येण्यापूर्वी चोरट्यांनी ऑनलाईन फसवणूक करून आर्थिक लूट केली. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.