। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
साळाव येथील जिंदाल विद्या मंदिरात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी वृक्षारोपण मोहीम व जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आली. मुख्याध्यापक मुकेश ठाकूर व उपमुख्याध्यापक मंगेश बमनोटे यांनी स्वतः झाडे लावून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. त्यांच्या बरोबरच शिक्षकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि शाळेच्या परिसरात अनेक झाडांची लागवड करण्यात आली. त्यानंतर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी शाळा व वसाहत परिसरात जनजागृती रॅली काढली. विद्यार्थ्यांनी ‘झाडे लावा, झाडे वाचवा’, ‘पर्यावरण वाचवा, पृथ्वी वाचवा!’ आणि ‘हरित बना, शुद्ध श्वास घ्या’ अशा घोषणांनी परिसर जागवला. या रॅलीचा उद्देश पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजावून देणे आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा होता.