अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबागमधील बांधकाम व्यवसायीकाला इमारतीचे बांधकाम करण्यासाठी फायनान्स कंपनीच्या खात्यातून 5 टक्के व्याजाने 450 कोटी कर्ज मिळत असल्याचे भासवून प्रोसेसिंग फि म्हणून 12 लाख आणि जिएसटी 2 लाख 16 हजार असे एकूण 14 लाख 16 हजार रुपये उकळले. मात्र कर्जाची रक्कम देत नसल्याने संशय आल्याने कर्ज प्रकरण रद्द करुन पैशाची मागणी केली असता अवघे 16 हजार रुपयेच परत करुन 14 लाखाची फसवणूक केली. याप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलिबाग तालुक्यातील चौल येथील पी.पी. कन्स्ट्रक्शन या बांधकाम व्यवसाय करणार्या कंपनीला अलिबाग तालुक्यातील चौल येथे इमारत बांधकाम करावयाचे असल्याने 12 कोटी रुपये रक्कमेच्या कर्जाची आवश्यकता होती. त्याचवेळी मे 2020 कालावधीत मे बॉम्बे फायनान्स इंडीया प्रा.लि.कंपनीचे डायरेक्टर असल्याचे भासवून पी.पी. कन्स्ट्रक्शन कार्यालयात येवुन त्यांनी कर्ज प्रकरणासंदर्भात चर्चा केली. आपल्या फायनान्स कंपनीच्या खात्यामध्ये 450 कोटी रुपये रक्कम उपलब्ध असून 5 टक्के व्याजदराने , दरमहा 9 लाख 48 हजार 952 रुपये हप्त्याने व 180 महीने फिर्यादीस सांगीतले. त्यानुसार दि. 13 जून 2020 रोजी फिर्यादी यांच्या अलिबाग येथील कार्यालयात पुन्हा अॅग्रीमेंट काण्यासाठी येवुन वकिलांकडे जावुन अॅग्रीमेंटची नोटरी करुन घेवुन फिर्यादीचा विश्वास संपादन केला. यावेळी त्यांनी प्रोसेसिंग फी म्हणुन 12 लाख रुपये व जीएसटी रक्कम म्हणुन 2 लाख 16 हजार रुपये असे एकुण 14 लाख 16 हजार रुपये पी.पी. कन्स्ट्रक्शन कंपनीच्या भारतीय स्टेट बँक शाखा अलिबाग येथील खात्यामधुन बॉम्बे फायनान्स इंडीया प्रा.लि.कंपनीचे ए यु स्मॉल फायनान्स बँक शाखा कल्याण पश्चिम येथील खात्यावर पाठविण्यास फिर्यादीला भाग पाडले. मात्र त्यांनतर कर्जाची रक्कम देत नाहीत म्हणुन संशय वाटल्याने फिर्यादीने कर्ज प्रकरण रदद करण्याबाबत आरोपीला पत्र दिले. त्यावर आरोपीने फिर्यादीकडुन स्विकारलेली एकुण 14 लाख 16 हजार रुपयांपैकी केवळ 16 हजार रुपये इतकीच रक्कम फिर्यादीच्या खात्यावर परत जमा केली. परंतु ठरल्यानुसार 12 कोटी रुपयांचे कर्ज आरोपीने फिर्यादीस न देता, सदर कर्ज मंजुरीकरीता आरोपीच्या सांगणेप्रमाणे फिर्यादीने आरोपीस दिलेले 14 लाख रुपये रकमेचा आरोपीने स्व:ताच्या फायदयासाठी अपहार करुन फिर्यादीचा विश्वासघात करुन फसवणुक केली. याबाबात दिलेल्या तक्रारीनुसार याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे भा.द.वि.420,406, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक शिंदे ह्या करीत आहेत.