बिल अपडेटच्या बहाण्याने गंडा

| पनवेल | प्रतिनिधी |

गॅस बिल अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर भामट्यांनी खारघरमधील 59 वर्षीय व्यक्तीला गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भामट्यांनी व्हॉट्सॲपद्वारे संशयास्पद एपिके फाईल पाठवून फसवणूक झालेल्या व्यक्तीच्या मोबाईलचा ताबा मिळवून त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 8 लाख 39 हजार 755 रुपये लंपास केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, खारघर येथील सतीश पिल्लाई हे गेल्या आठवड्यात आपल्या घरी असताना, त्यांना सायबर भामट्यांनी महानगर गॅस कंपनीचा कर्मचारी असल्याचे भासवले. तसेच, त्यांच्या गॅसचे बिल अपडेट करणे बाकी असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर भामट्यांनी गॅसचे बिल अपडेट करण्याच्या बहाण्याने पिल्लाई यांच्या व्हॉट्सॲपवर एपिके फाईल पाठवून ती डाऊनलोड करण्यास सांगितले. पिल्लाई यांनी ती फाईल डाऊनलोड केल्यानंतर सायबर चोरट्यांनी पिल्लाई यांचा मोबाईल हॅक करून त्यांच्या बँक खात्यातून काही वेळातच 8 लाख 39 हजार 755 रुपये ऑनलाईन पद्धतीने काढून घेतले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे पिल्लाई यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.

Exit mobile version