बाप्पाच्या आगमनासाठी मूर्तिकारांची धावपळ
| उरण | प्रतिनिधी |
गणरायाचे आगमन 14 सप्टेंबर रोजी घरोघरी होणार असल्याने उरण तालुक्यात गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने उरण शहरासह तालुक्यातील गावागावांमध्ये गणेशमूर्तींच्या रंगकामाची लगबग सुरू झाली आहे.
कच्च्या मूर्तींना पॉलीश करणे, आकर्षक रंग देणे, रंगसंगती साधणे, नक्षीकाम करणे आणि मूर्तीला अंतिम रूप देण्याचे काम मूर्तिकार व कारागिरांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. भक्तांच्या आवडीनुसार विविध आकारांच्या आणि आकर्षक स्वरूपातील गणेशमूर्ती साकारल्या जात असून, बाप्पाच्या मूर्तीला मनोहारी रूप देण्यासाठी कारागीर दिवसरात्र मेहनत घेत आहेत.
कारागिरांच्या हाताला रोजगार
गणेशोत्सवामुळे मूर्तीनिर्मितीपासून रंगकाम, सजावट, वाहतूक आणि विक्रीपर्यंत विविध स्तरांवर स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. मूर्तींच्या रंगकामात आणि सजावटीच्या कामात महिलांचाही मोठा सहभाग दिसून येत आहे.
पेणच्या मूर्तींना उरणमध्येही मोठी मागणी
गणेशमूर्ती निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या पेणमधून उरण परिसरातही मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती येतात. आकर्षक, रेखीव आणि कलात्मक मूर्तींना उरणमधील गणेशभक्तांकडून विशेष पसंती मिळत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्र्श्वभूमीवर मूर्तिकार, रंगकाम करणारे कारागीर, वाहतूकदार आणि विक्रेत्यांच्या व्यवसायालाही चांगली चालना मिळत आहे.
'बाप्पा मोरया'च्या जयघोषासाठी उरण सज्ज!
गणेशोत्सव जवळ येत असल्याने पुढील काही दिवसांत मूर्तींच्या रंगकामाला आणखी वेग येणार आहे. मूर्तिकारांच्या कुशल हातांनी साकारलेला गणराया आता भक्तांच्या घराघरांत विराजमान होण्यासाठी सज्ज होत आहे.







